esakal | कोल्हापूर: जहाजातच बनवली गणेशमूर्ती!
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: जहाजातच बनवली गणेशमूर्ती!

कोल्हापूर: जहाजातच बनवली गणेशमूर्ती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: त्याचं नोकरीचं कार्यक्षेत्र भर समुद्रात. कोरोनाच्या अंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे जहाज पोर्टला लागलं तरी कुठल्याही दर्यावर्दीला जमिनीवर उतरायची परवानगी नाही. त्यामुळे घरी येण्याचा प्रश्नच नाही. फुलेवाडी येथील मंथन पाटील याच्यावर ओढवलेली ही परिस्थिती. पण, मनातील गणेशभक्ती जागवत अखेर त्याने जहाजावरच मूर्ती साकारून तिची प्रतिष्ठापना केली आहे आणि या मूर्तीच्या साकारण्यामागचा प्रवासही तितकाच रंजक आहे.

हेही वाचा: कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

मरीन कॅटरींग आणि हॉटेल मॅनेजमेंटचा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम मदुराई येथे पूर्ण केल्यानंतर मंथनचा पहिला नोकरीचा करार झाला तो व्हिएतनाम- इंडोनेशिया-सिंगापूरसाठी. तो पूर्ण करताच दुसरा करार होवून तो दक्षिण कोरिया येथे नोकरीवर रूजू झाला. पण, गेल्या वर्षीपेक्षाही यंदा कोरोना निर्बंध कडक आहेत. गेल्यावर्षी त्याने जहाजावरच आट्ट्याच्या पिठाची मुर्ती करून तिची प्रतिष्ठापना केली होती. त्यामुळे यंदा गणेशोत्सव जवळ येईल तशी त्याच्या मनाची चलबिचल वाढू लागली. कारण जहाजावर माती कुठून मिळवणार, हा प्रश्न होता.

अमेरिकेत मेक्सिकोजवळचा कार्पस् ख्रिस्ती हा त्याच्या जहाजाचा मुख्य पोर्ट आणि तिथून ब्राझिलमधील सॅल्वाडोर पोर्टपर्यंतचा नियमित प्रवास. या प्रचंड मालवाहू जहाजाचा या दोन देशादरम्यान जाऊन येवून एका फेरीचा प्रवास सुमारे सव्वा महिन्याभराचा. एका टोकावरून निघालं की दुसऱ्या ठिकाणी पोचेपर्यंत ना कुठला पोर्ट, ना जमिनीचं दर्शन. सभोवार फक्त अथांग समुद्र आणि त्यात जेमतेम पंचवीस जणांचे तरंगते जग. कोरोनाच्या काळात जास्तीजास्त पोर्टपासून समुद्रात दुरवर जहाज नांगरण्याचे नियम आहेत. म्हणजेच जहाजांचेही सक्तीचे अलगीकरण करावे लागते.

त्यामुळे जमिन फक्त दुरवरून बघायची. पण, त्यावर उतरायचं नाही. एकदा काम आटपून सहजच डेकवरून समुद्र न्यहाळताना त्याची नजर जहाजाच्या नांगरावर पडली आणि त्याला समुद्राच्या तळातील राळ माती नांगराला चिकटून वर आलेली दिसली. त्याचा मातीचा शोध संपला. त्याने मग याच राळमातीच्या गोळ्यातून सुबक मूर्ती साकारली.

जहाजावरची नियमित ड्युटी करत ती सुबकपणे रंगवली आणि तिची प्रतिष्ठापना केली. जहाजातील कॅटरींग विभागातच सहाय्यक शेफ म्हणून तो काम करत असल्याने खिर- मोदकांचा पारंपारिक नैवेद्यही तो बनवतो आणि पंचवीस जणांच्या या तरंगत्या जगात आरतीचे सूर उमटतात. दरम्यान, मंथन येथील निसर्ग छायाचित्रकार मिलिंद पाटील यांचा मुलगा आहे.

loading image
go to top