esakal | कोल्हापूर: रिमझिम पावसाच्या वर्षावात आल्या गौराई
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: रिमझिम पावसाच्या वर्षावात आल्या गौराई

कोल्हापूर: रिमझिम पावसाच्या वर्षावात आल्या गौराई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: रिमझिम पावसाच्या सरी झेलत मात्र तितक्‍याच सळसळत्या उत्साहात समृद्धीच्या पावलांनी आज घरोघरी गौराईचे आगमन झाले. शंकरोबाचे आगमन होणार असून, त्याच्या स्वागतासाठी गौराई नटणार आहे. दरम्यान, पंचगंगा घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम बंधारा आदी ठिकाणी गौरी आवाहनासाठी महिला व मुलींची दिवसभर वर्दळ राहिली. यानिमित्त अस्सल मराठमोळी संस्कृतीच येथे अवतरली. बेंजो, डोलीबाजा आणि बॅंडसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात गौरी आगमनाचा सोहळा सजला.

हेही वाचा: सांगली: कोयना धरणातून २५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

सकाळी दहा वाजल्यापासूनच नटूनथटून गौरी आवाहनासाठी महिला बाहेर पडल्या. गटागटाने महिला पंचगंगा, रंकाळ्याकडे येऊ लागल्या. फुले, आगाडा, दुर्वा, कण्हेरीच्या फुलांच्या माळांनी सजविलेले चकचकीत तांब्या-पितळेचे न्हावण घेऊन गौरीचे आगमन सुरू झाले. तेथे विधिवत पूजा आणि आरती केली. महिलांनी ‘ये गं गौराबाई एवढं जेवून जाई’, ‘कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या गं माहेरी...’ अशा गीतांवर झिम्मा-फुगडीचा फेर धरला. गौराई गीतांनी हा सारा परिसर महिलांच्या आनंदोत्सवाने भारून गेला.

लहान कलशात विधिवत पूजा करून विविध वाद्यांच्या गजरात महिलांनी गौराईचे आगमन केले. दिवसभर पावसाने तुरळक हजेरी लावल्याने बहुतांश महिला रिक्षा, चारचाकी वाहनांतूनही गौरी आवाहनासाठी येथे आल्या; परंतू घाटावर महिलांनी गर्दी करू नये, याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने चारचाकी वाहने घाटापर्यंत जाऊ शकल्या नाही. काही कुटुंबांनी दुचाकीवरूनही गौरी आवाहनासाठी हजेरी लावली.

परंपरेप्रमाणे आगमन झाल्यानंतर भाजी-भाकरीच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली. भाजी-भाकरीचा नैवेद्य मिळाल्यानंतर गौराई शंकरोबाच्या प्रतीक्षेत विसावल्या. गौराई-शंकरोबाला नटविण्यासाठी आज मुखवटे, नवीन भरजरी साड्या, दागिने, केसातील वेणीची व्यवस्था करण्यात घरोघरी महिला दिवसभर व्यस्त राहिल्या.

सेल्फी विथ गौराई

कोणताही सण समारंभ असला की सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. पंचगंगा नदी घाट, रंकाळा परिसरासह पाणवठ्यावर गौरी आवाहनासाठी आलेल्या महिलांनी तर पारंपरिक वेशभुषेत ‘गौराई’ सोबत सेल्फी घेत गौरी आगमनाचा उत्साह द्विगुणीत केला. सोशल मिडीयावर हे सेल्फी अपलोड करत सोशल मिडीयावरही आनंदोत्सव साजरा केला.

तेरडा, द्रोणपुष्पीची फुले मोकळ्या माळावर टाकण्याचे आवाहन

यंदा पावसाचा असमतोलपणा, बदलेले वातावरण यामुळे गौरी - शंकरोबाच्या पुजनासाठी वापरल्या जाणाऱ्या तेरडा, द्रोणपुष्पी या वनस्पती कमी प्रमाणात उपलब्ध झाल्या. त्याचे दरही वाढले होते. यंदा मात्र गौरी शंकरोबाच्या विसर्जनापुर्वी वनस्पतींची फुले काढून वाळवून ठेवावीत, असे आवाहन आज सोशल मिडीयाव्दारे झाले. वाळलेली फुले मोकळ्या मैदानावर, परसबागेत पसरल्यानंतर पुढील वर्षी पावसाळ्यात तुम्हाला हवी तेवढी तेरडा व द्रोणपुष्पी वनस्पती उपलब्ध होईल. यासाठी हा उपक्रम राबविण्याचे आवाहन सोशल मिडीयावरून व्हायरल झाले.

loading image
go to top