कोल्हापूर : ‘गोकुळ’ उभारणार बायोगॅस प्रकल्प

उद्या उद्‌घाटन, द्रवरूप शेणखत प्रकल्पाचाही समावेश
gokul
gokulsakal

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) निवडक गावांत बायोगॅस प्लँट व स्लरी प्रकल्प (द्रवरूप शेणखत) उभारण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाचे उद्‌घाटन माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. गडमुडशिंगी येथील संघाच्या पशुखाद्य कारखान्यात कार्यक्रम होईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड व सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन (टाटा ट्रस्ट) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन यांच्याकडून आलेले १२० प्लेक्सी बायोग प्लँट ५० टक्के अनुदानावर निवड गावांमध्ये महिला दूध उत्पादकांना दिले आहेत. द्रवरूप शेणखत प्रकल्पासाठी लागणारी प्रयोगशाळेकडील उपकरणे, स्लरी गोळा करण्यासाठी टँकर आदी साहित्य फौंडेशनकडून मिळालेल्या अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘या प्रकल्पांतर्गत बसवण्यात येणाऱ्या बायोगॅससाठी रोज ४५ ते ५० किलो शेण व ५० लिटर पाणी घालायचे. यातून निर्माण होणाऱ्या गॅसमधून पाच ते सहा लोकांचा स्वयंपाक होईल. त्यामुळे महिन्याच्या दोन सिलिंटरची दोन हजार रुपयांची बचत होणार आहे. प्रकल्पातून ८० ते १०० लिटर मिळणारे द्रवरूप शेणखत शेतीसाठी वापर करता येईल. या प्रकल्पातून शिल्लक राहिलेले द्रवरूप शेणखत तिच्या गुणवत्तेनुसार २५ पैसे ते दोन रुपये लिटर दराने ‘गोकुळ’ खरेदी करणार आहे. यातून महिन्याला किमान १५०० रुपये उत्पादकांना मिळणार आहेत. चार ते पाच जनावरे असलेल्या कुटुंबाला या दोन्ही प्रकल्पातून महिन्याला अंदाजे ३५०० रूपये मिळतील.’’

प्रकल्पांतर्गत ‘गोकुळ’मार्फत प्रतिदिन पाच टन क्षमतेचा द्रवरूप शेणखत प्रकल्प पशुखाद्य कारखान्यात उभारण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या द्रवरूप शेणखतावर प्रक्रिया करून त्यापासून ‘फॉस्फ-प्रो’ या फॉस्परयुक्त सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येईल. हे सेंद्रीय खत डीएपीसाठी उत्तम पर्याय आहे, अशी माहितीही श्री. पाटील यांनी दिली.

या वेळी प्रताप पडवळ उपस्थित होते.

असा मिळणार निधी

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड- ४३ लाख रुपये

सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन - ४९ लाख ६५ हजार रुपये

एकूण - ९२ लाख ६५ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com