Kolhapur Honey trap : हनी ट्रॅपचे आणखी दोन प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

honey trap
हनी ट्रॅपचे आणखी दोन प्रकार

Kolhapur Honey trap : हनी ट्रॅपचे आणखी दोन प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर/नागाव : शहर परिसरातील आणखी दोन व्यापारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. एका व्यापाऱ्याकडून ३५ लाख, तर दुसऱ्याकडून एक लाख उकळल्याचे उघड झाले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून हा प्रकार केल्याची नोंद शाहूपुरी व शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सहा संशयितांना अटक केली. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका व्यापाऱ्याची फेसबुकवर एका मुलीशी ओळख झाली. तिने चॅटींग करत त्यांना व्यवसायाच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, असा बहाणा करून तावडे हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना सादळे-मादळे परिसरात नेले. तिने स्वतःची ओळख लपवत व्यवसायासंबंधी चर्चा केली नाही. स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये खोली घेण्यास भाग पाडले. खोलीत असताना दरवाजा ठोठावून तिचे पाच ते सहा साथीदार आत घुसले. त्यांनी ती आपली बहीण असल्याचे सांगून, तिच्याशी गैरप्रकार केलास, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना मोटारीतून कुशिरे घाटात नेऊन मारहाण केली. अब्रू वाचविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली. यामध्ये दहा लाख रुपयांवर तडजोड झाली. त्यातील एक लाख रुपये दोन नोव्हेंबरला घेतले. त्यानंतर उर्वरित रकमेसाठी वारंवार दूरध्वनी करून धमकी देण्यात आली, अशी फिर्याद पीडित व्यापाऱ्याने दिली. त्यानुसार एका महिलेसह पाच ते सहा संशयितांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सोनाली ऊर्फ प्रतीक्षा पाटील या संशयित महिलेला अटक केल्याचे प्रमोद जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

दरम्यान, अन्य एका हनी ट्रॅप प्रकरणात शहरातील एका उद्योजकाची लाखोंची फसवणूक करण्यात आली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. विजय यशवंत मोरे (वय ३६, रा. व्हन्नूर, ता. कागल), सागर पांडुरंग माने, रोहित कोंडिराम साळोखे (३७, रा. शिवाजी पेठ), फारुख बाबासाहेब खान (३२, रा. महाराणा प्रताप चौक परिसर), प्रमोद ऊर्फ गणेश पुंडलिक शेवाळे (३०, रा. कळंबा जेल परिसर) व विजय ऊर्फ पिंटू शंकर कलकुटगी (३९, राजारामपुरी १० वी गल्ली) अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की एका उद्योजकाला एका महिलेसह सात संशयितांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण केली. त्यांच्याकडून एप्रिल २०१९ पासून संगनमताने एकूण ३५ लाख रुपये काढून घेतले, अशी फिर्याद संबंधित उद्योजकाने दिली.

दोन्ही गुन्ह्यात एकच सूत्रधार

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव व त्यांच्या पथकाने या दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू केला. दोन्ही प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित सागर माने असल्याचे तपासात पुढे येत आहे. त्याच्यावर यापूर्वीच्या गुन्ह्यात कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

loading image
go to top