

Kolhapur Illegal Lending
esakal
कोल्हापूर : चार वर्षांपूर्वी हा तरुण केशकर्तनालयात काम कारायचा. ओळखीतील महिलेला पैशांची गरज असल्याने दुसऱ्याकडून सहा लाख घेऊन काही दिवसांत ३० लाख उकळले. मोठमोठ्या गुंडांचे रिल्स दाखवून महिलेवर दहशत करत अवघ्या दोन वर्षांत कोट्यवधींची रक्कम उकळून नवीन बंगला, मोटारीची खरेदी करून बेरोजगारीवर मात केली. फुलेवाडी रिंगरोडवरील सिद्धेश गायकवाड या बेकायदा सावकाराचे किस्से भागात चर्चेचे ठरले आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाईसाठी उपनिबंधकांकडे पत्र पाठवले असून, या मालमत्तेची आता चौकशी सुरू केली आहे.
महिला अभियंता गीता मोरे ही उच्चशिक्षित असल्याने काही तरी करण्याची धडपड तिच्यात होती. महावितरणची काही कंत्राटे घेणाऱ्या मोरे यांना बॅटरी दुरुस्तीचे दुकान सुरू करायचे असल्याने त्यांनी ओळखीतील सिद्धेश गायकवाडकडून २०२१ मध्ये सहा लाख घेतले होते. यानंतर वेळोवेळी व्याज भागवूनही गायकवाडकडून अधिक रकमेसाठी तगादा सुरू होता. यातून जवळपास दोन कोटी ५२ लाखांची रक्कम त्याने उकळल्याचा गुन्हा दाखल करून करवीर पोलिस अटकेतील सिद्धेश गायकवाड, अजिंक्य जाधव याच्याकडे आज दिवसभर चौकशी करीत आहेत.
सिद्धेश गायकवाड हा आईसोबत शिवाजी पेठेत राहण्यास होता. गीता मोरे यांना सावकारीतून दिलेल्या सहा लाखांपोटी १२ लाख उकळल्यानंतर त्याची हाव वाढत गेली. वेगवेगळ्या कारणांनी त्याने व्याजाचा तगादा सुरू ठेवला. मुलीच्या अपहरणाच्या भीतीचे भांडवल करून मोरे यांच्या वडिलांच्या फंडातील रक्कम, आईचे दागिनेही बळकावले. यातून फुलेवाडी रिंगरोडवरील मथुरा नगरीत बंगला खरेदी केला. तसेच नवीन मोटारही २०२४ मध्ये खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.
शहरातील काही गुंडांच्या रिल्स दाखवून आपला त्यांच्यासोबतचा वावर असल्याचे संशयित गायकवाड सर्वांना सांगत होता. रोजंदारीवर काम करणारा गायकवाड अचानकपणे मोटारीतून फिरू लागला. गुंड स्वप्नील जाधव ऊर्फ लालाशेठ याच्यासोबत आपली खास ओळख असल्याचे तो सांगत होता. गुंड अजित तिवडे याचे अनेक रिल्सही त्याने दाखवत लुबाडणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे.
संशयित सिद्धेश गायकवाड, अजिंक्य जाधव याच्याकडे सावकारीचा कोणताही परवाना नाही. अवघ्या काही वर्षांत त्यांनी केलेल्या कमाईची चौकशी होणार आहे. सावकारी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, असे पत्र करवीर पोलिस ठाण्याकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठवले आहे. संशयित गायकवाडची मोटारही जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
इचलकरंजीतील कामगारवर्गाला लक्ष्य करून बेकायदेशीर सावकारी फोफावली आहे. यापूर्वी इचलकरंजी, जयसिंगपूर येथे खासगी सावकारांवर छापे टाकण्यात आले होते. मात्र, अनेक सावकारांवर अटकेची कारवाई झाली नसल्याने केवळ फार्स निर्माण केल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.