कोल्‍हापूर : आरोप-प्रत्यारोपात विकासाचा मुद्दा गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Politics

कोल्‍हापूर : आरोप-प्रत्यारोपात विकासाचा मुद्दा गायब

कोल्‍हापूर: कोल्‍हापूर उत्तरच्या निवडणूक प्रचारात महाविकास आघाडी व भाजपकडून राज्यस्‍तरीय नेते उतरले आहेत. राज्यात एकमेव पोटनिवडणूक असल्याने दोन्‍ही बाजूंनी मोठी ताकद लागली आहे. राज्यस्‍तरीय नेते प्रचारासाठी शहरात येत आहेत. या नेत्‍यांकडून शहराच्या समस्या, योजना, पुढील ध्येयधोरणे यावर काहीतरी मार्गदर्शन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शहराच्या समस्यांपेक्षा दोन्‍ही पक्षांनी वैयक्ति‍क टीकाटिप्‍पणी व आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडवण्यातच धन्यता मानली आहे.

उन्‍हाच्या चटक्याप्रमाणेच आरोप-प्रत्यारोपांनी उत्तरच्या पोटनिवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी पहिल्या टप्‍प्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक हे सभा, बैठका, प्रचारफेऱ्या काढून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. दुसऱ्या टप्‍प्यात राज्यस्‍तरावरील नेत्यांच्या सभांना सुरुवात झाली आहे. मात्र प्रचाराचे दिवस कमी होत जातील तसे आरोपांचा धुरळा उडू लागला आहे.

थेट पाईपलाईनचे काम अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. दोन्‍ही सरकारच्या काळात पाईपलाईनचे काम कोठेपर्यंत झाले, हे सांगणे आवश्यक होते. रस्‍त्यांची अर्धवट कामे, केबल खोदाईमुळे रस्‍त्याची झालेली चाळण, दरवर्षी महापुराचा दणका, पूररेषा, एकेरी मार्ग, सिग्‍नल, सीसीटीव्‍ही, वाहतूक कोंडी या विषयांवर प्रचार करत असताना राजकीय पक्षांनी बोलणे आवश्यक होते. सत्ताधाऱ्यांनी आम्‍ही काय करतोय हे सांगणे आवश्यक होते. तर त्यातील त्रुटी दाखवण्याचे काम विरोधकांनी करणे आवश्यक होते. मात्र शहराच्या व नागरिकांच्या जिव्‍हाळ्याच्या प्रश्‍‍नांवर बोलण्यास कोणीच तयार नाही.

शहराच्या विकासावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक कुरघोडी, कौटुंबिक बदनामी, शिवीगाळ, धमकी, अपप्रचार, मतदारांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यावर दोन्‍ही बाजूंकडून भर दिला जात आहे. शहराच्या विकासास मारक ठरणाऱ्या‍ गोष्‍टींनाच प्रचारात प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. नागरिकही तटस्‍थपणे राजकीय पक्षांच्या भूमिका पाहत आहेत. निवडणूक प्रचाराचा आता दुसरा टप्‍पा सुरु आहे. यातही राज्यस्‍तरीय नेते सहभागी होणार आहेत. किमान त्यांनी तरी प्रचारसभा घेत असताना शहराच्या विकासाचे मुद्दे घ्यावेत, एवढी माफक अपेक्षा मतदारांकडून व्यक्‍त होत आहे.

शिळ्या कढीला ऊत

पोटनिवडणुकीतील प्रचारात कोणतेही नवीन मुद्दे नाहीत. केवळ आरोप करण्यासाठी, बदनामी व मतदारांची दिशाभूल करण्यासाठी जुने संदर्भ दिले जात आहेत. यामध्ये वृत्तपत्रांची कात्रणे, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंगचा वापर केला जात आहे. यातील शिवराळ भाषा सुशिक्षित माणसाला पचनी न पडणारी व राजकीय पक्षांनाही परवडणारी नाही. चुकीच्या प्रचाराचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: Kolhapur Issue Development Missing Allegations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top