फौजदार परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

१९ जणांचे यश; गडमुडशिंगीची कांबळे ‘मागासवर्गीय’मध्ये राज्यात प्रथम
पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील परीक्षार्थींनी यशाचा झेंडा
पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील परीक्षार्थींनी यशाचा झेंडाsakal

कोल्हापूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील परीक्षार्थींनी यशाचा झेंडा फडकवला. गडमुडशिंगीची दीपाली रवींद्र कांबळे हिने अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. बापट कॅम्पमधील धनश्री विठ्ठल तोरस्कर ओबीसी स्पोर्टस्‌ प्रवर्गातून राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

कोल्हापूरच्या योगेश श्रावण जाधवने एससी प्रवर्गातून ७, विजय अण्णासाहेब कदमने एससी २४, पुष्पांजली निवास जांभळे ओपन प्रवर्गातून २९, चुये (ता. करवीर) येथील प्रियांका सुरेश माने ओबीसी महिला ११, कुशिरे (ता. पन्हाळा) येथील अभिजित श्रीकांत घोरपडे ओबीसी जनरल १३ व वाडी रत्नागिरीतील सुशांत शंकर उपाध्ये याने ओबीसी जनरलमधून १६ वा क्रमांक मिळविला.

वडणगे (ता. करवीर) येथील शंभू आनंदराव पाटील ओबीसी जनरल १७, शिरोली पुलाचीतील रणजित आकाराम कांबळे याने एससी प्रवर्गातून २५, तर पुंगावच्या रोहित बाळासाहेब जाधव याने एससी प्रवर्गातून ३१ व मौजे आगर (ता. शिरोळ) येथील अल्फा खांडेकर हिने ३१, जिवबा नाना पार्कातील विशाल रंगराव गडकरने एससी प्रवर्गातून ४०, शाहूवाडीतील शीतल राजाराम पाटीलने खुल्या गटातून ४५, मुदाळच्या रविकुमार शिवाजी पाटील खुल्या गटातून ८०, पुलाची शिरोलीतील हैदर शौकत संदे खुल्या गटातून ८६, कोल्हापूरच्या युवराज जगन्नाथ जगताप खुल्या गटातून ८७, रेंदाळच्या प्रकाश शामराव सादळेने खुल्या गटातून ८९ व कुलदीप सुरेश पोवारने खुल्या गटातून १११ व्या क्रमांकावर बाजी मारली.

आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षकपदासाठी २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पूर्व परीक्षेनंतर ४ ऑगस्टला मुख्य परीक्षा झाली. त्याचा निकाल जानेवारी २०२० मध्ये लागला. मुलाखत व शारीरिक चाचणी घेण्याची तयारी सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे देशात लॉकडाउन सुरू झाले. पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला आला आणि आरक्षण रद्द झाले. आरक्षण रद्द झाल्याने ऑक्टोबर २०२१ मध्ये निकालात बदल झाला. परीक्षार्थींची मुलाखत जानेवारी २०२२, तर शारीरिक चाचणी २२ फेब्रुवारी २०२२ ला झाली. त्यानंतर परीक्षार्थींना निकालाची उत्सुकता होती. आज निकाल जाहीर होताच यशस्वी परीक्षार्थींनी आनंदोत्सव साजरा केला. अरुण नरके फाउंडेशन, स्टडी सर्कल, युनिक ॲकॅडमी, दीपक अतिग्रे अॅकॅडमीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यासह सोलापूर जिल्ह्यातील सारिका मरकड ओपन प्रवर्गातून ३५, वंदना विष्णू वेल्हात एसटी प्रवर्गातून ३, प्रकाश गोरड एनटी क प्रवर्गातून ४, सांगलीतील ज्योत्स्ना प्रकाश गावडे, साताऱ्यातील राधिका जयसिंग हजारे आदींनी यश मिळविले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवले यश

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दीपाली रवींद्र कांबळे (वय २६) ही ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मागासवर्गीय (एस. सी.) महिलामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. आई-वडिलांची पुण्याई, आत्या, मामाचे पाठबळ व गुरुवर्याचे मार्गदर्शन यामुळे यश मिळाल्याचे तिने सांगितले. दीपाली रवींद्र कांबळे हिचे प्राथमिक शिक्षण गडमुडशिंगी येथील कन्या शाळेतून झाले आहे. तर, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी येथून झाले. महावीर महाविद्यालयमधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या बरोबर रुकडीच्या शाहू कॉलेज येथून एम. ए. इतिहास शिक्षण घेतले आहे. या शैक्षणिक प्रवासादरम्यान प्रा. डॉ. के. के. चौगुले यांनी तिला शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पाठबळ दिले. तसेच, शारीरिक प्रशिक्षणासाठी सरदार भित्तम यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी तिने २०१५ ते २०१९ स्टडी सर्कल कोल्हापूर येथील अभ्यासिकेचा आधार घेतला. त्यानंतर २०१९ ते २०२२ घरीच स्वयं अध्यायन करून या परीक्षेची तयारी केली.

दिपालीचे वडील हे आर. बी. पाटील किसान संघातून निवृत्त झाले, पण गेल्या अनेक वर्षांपासून ते पॅरालिसिस या आजाराने त्रस्त आहेत. आपल्या मुलीने कष्टाने मिळवलेल्या यशामुळे त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. आई अंजना ह्या घाटगे-पाटील कंपनी, उचगाव येथे कामाला आहेत. आपल्या चारी मुलांचा सांभाळ त्यांनी धाडसाने केला आहे.

नुकताच निकाल जाहीर झाल्यानंतर मागासवर्गीय महिलामध्ये राज्यात पहिली आल्याचे समजताच ए. बी. फाउंडेशनचे अतिग्रे सर, आई वडील, मामा, मामी,भाऊ, आत्या, बहीण, दाजी, मित्र मंडळी, नातेवाईक यांनी पेढा भरवून व फटाक्यांची आतष बाजी करीत तिचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com