Kolhapur : शाही दसरा सोहळ्याची तयारी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur Ambabai temple

Kolhapur : शाही दसरा सोहळ्याची तयारी सुरू

कोल्हापूर : नवरात्रोत्सव आता सांगतेकडे निघाला असून, उत्सवातील उत्साह टिपेला पोहोचला आहे. देवीच्या जागरानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. उद्या (मंगळवारी) खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन होणार असून, बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. ऊस, लव्हाळा, झेंडूच्या फुलांसह पूजेच्या साहित्याला मागणी आहे. यंदा पावसामुळे झेंडूचा दर वाढला आहे. शंभर ते एकशे वीस रुपये किलोने झेंडूची विक्री झाली. दरम्यान, ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानीची आज विड्याच्या पानातील पूजा बांधण्यात आली.

हेही वाचा: Kolhapur : गृह प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी

अष्टमी जागर सोहळा उत्साहात

येथील कोल्हापूर चित्तपावन संघातर्फे काल मंगलधाम हॉल येथे अष्टमी जागर सोहळा उत्साहात झाला. यानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन झाले. सोहळ्याचे संयोजन अध्यक्ष नंदकुमार मराठे, उपाध्यक्ष प्रसाद भिडे यांनी केले. सकाळी नवदुर्गापूजन त्यानंतर नवविवाहित महिलांच्या हस्ते पूजा केली. सायंकाळी तांदळाच्या उकडीपासून बनवलेल्या श्री महालक्ष्मीच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करून घागरी फुंकण्याचा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा: Kolhapur : गुप्तधन असं काय नसतं भाऊ!

यावेळी महिलांनी दर्शनाला आणि ओटी भरायला मोठी गर्दी केली. ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, उद्योजक राजेश दीक्षित, कार्यवाह केदार जोशी, मकरंद करंदीकर, संतोष साने, संगीता आपटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Kolhapur : अंबाबाईचा आज नगरप्रदक्षिणा सोहळा

अंबाबाई भाविकांसाठी उद्यापासून रक्तदान शिबिर

व्हाईट आर्मी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळातर्फे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी बुधवारी (ता. ५) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. व्हाईट आर्मीतर्फे अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असलेल्या वैद्यकीय साहाय्यता केंद्रात सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत हे शिबिर होणार आहे. त्याशिवाय गुरुवारी (ता. ६) स्थानिक भाविक, स्वयंसेवकांसाठी शिबिर होणार आहे. गेली काही महिने जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असून, तुलनेत रक्ताची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हे शिबिर होणार असून, सर्वांनी रक्तदान करून श्री अंबाबाईची अनोखी सेवा करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हेही वाचा: Kolhapur : त्र्यंबोली यात्रेचा उद्या सोहळा

शाही दसऱ्यात सहभागी व्हा; जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा महोत्सव यावर्षी पर्यटकांचे विशेष आकर्षण बनणार आहे. बुधवारी (ता.५) दसऱ्यादिवशी भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर देवीच्या पालख्यांसोबत राजेशाही मिरवणूक, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या महोत्सवातून घडेल. राज्यासह देशभरातील नागरिकांनी शाही दसरा महोत्सवात सहभागी होऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्ध केले आहे. मिरवणूक मार्गावर देवीच्या पालख्यांसह चित्ररथ, लेझीम, ढोलपथक, धनगरी ढोल, गजनृत्य, मल्लखांब, कुस्तीची प्रात्यक्षिके, पोवाडा तसेच विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.

हेही वाचा: Kolhapur : UDID कार्ड वाटप शिक्षकांच्या माथी

भवानी मंडप कमानीला उद्या ताम्रकलश मंगल तोरण

हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे गेली ३४ वर्षे जुना राजवाडा भवानी मंडपाच्या ऐतिहासिक कमानीस मंगल कलश तोरण अर्पण केले जाते. विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारी (ता. ५) सकाळी नऊ वाजता हा सोहळा होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मानही होणार आहे. यंदा कलशपूजनाचा मान विधवा परंपरेला झुगारून देणाऱ्या भगिनी व समाजाने न स्वीकारलेल्या तृतीयपंथीयांना देण्यात आला आहे.