

Vote counting begins in Kolhapur as political heavyweights
esakal
Political Prestige Battle Kolhapur : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या दिग्गजांच्या लढतीबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. या लढतीत बाजी कोण मारणार हे अवघ्या काही मिनीटात कळणार आहे. त्यातही ज्या नऊ ठिकाणी १८ माजी नगरसेवकच आमने-सामने आहेत, त्या प्रभागातील निकालाची उत्सुकता तर शिगेला पोहचली आहे.
भाजपचे संजय निकम व काँग्रेस पुरस्कृत विधानसभेचे उमेदवार माजी नगरसेवक राजेश लाटकर या लढतीकडेही प्रभागाच्या नजरा लागल्या आहेत. दोघेही उमेदवार ताकदवान तर आहेतच, पण या दोघांच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अशीच लढत प्रभाग क्र. ९ मध्ये राहुल माने विरुद्ध शारंगधर देशमुख या दोन माजी नगरसेवकांत होत आहे.
याठिकाणीही आमदार पाटील यांच्याबरोबरच पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार क्षीरसागर यांची या प्रभागातील ताकद स्पष्ट करणारी ठरणार आहे. प्रभाग क्रमांक सहामधील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे व प्रतापसिंह जाधव यांचीही लक्षवेधी लढत चर्चेचा विषय आहे. या प्रभागाला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगरसेवक उमा बनछोडे विरुद्ध माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या पत्नी दीपा ठाणेकर यांच्यातील लढत ही दोघांचेही राजकीय भवितव्य ठरवणारी ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक ११ ब मधील तिरंगी लढतीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पत्नी व माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक यशोदा मोहिते व ‘जनसुराज्य’च्या चिन्हावर रिंगणात असलेल्या माजी नगरसेविका शारदा देवणे यांचा कस लागणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास व काँग्रेसचे ईश्वर परमार या दोन दिग्गज माजी नगरसेवकांतील लढतीवर तर थेट बेटींग लागले आहे. अशीच स्थिती अजित मोरे विरुद्ध विनायक फाळके या दोन माजी नगरसेवकांच्या प्रभाग क्रमांक १४ ड मधील लढतीची आहे. भाजपच्या रूपाराणी निकम व काँग्रेसचे भूपाल शेटे या दोन ताकदीच्या माजी नगरसेवकांतील लढतही लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
माजी महापौर सई खराडे यांचे पुत्र शिवतेज व माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे या नात्या-गोत्यातील लढतीवर शिवाजी पेठेचे भविष्यातील राजकारणच ठरणार आहे. भाजपचे विजयसिंह खाडे व काँग्रेसचे मधुकर रामाणे या दोन माजी नगरसेवकांतील काटाजोड लढतीने प्रभागाचे लक्ष वेधले आहे. याशिवाय माजी नगरसेवक शिवाजी डवरी यांच्या पत्नी व माजी शिक्षण समिती सभापती प्रेमा डवरी विरुद्ध दिलशाद सत्तार मुल्ला या पारंपरिक विरोधकांतील लढतही चुरशीची होण्याची शक्यता आहे. डवरी या राष्ट्रवादी अजित पवार पक्षांकडून, तर मुल्ला या काँग्रेसकडून रिंगणात आहेत.
१६ ठिकाणी दुरंगी लढत
एकूण ८१ ठिकाणांपैकी १६ ठिकाणी थेट दुरंगी लढतीचे चित्र आहे. यापैकी दहा ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप, तर सहा ठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना आहे. पैशाचा वारेमाप वापर, शेवटच्या क्षणापर्यंत एका-एका मतासाठी सुरू असलेली चुरस आणि नेत्यांनी लावलेला बळाचा पट या १६ ठिकाणी कुणाला विजयापर्यंत नेणार हे उद्या स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.