कोल्हापूर : तेरा दशकं होते ग्रंथांचीच पूजा

कुंभार समाजाची वारी परंपरा, आज दिंडीचे होणार प्रस्थान
 पूजा
पूजाsakal

कोल्हापूर : मातीत राबत सुबक मूर्ती साकारणाऱ्या कुंभार समाजाचे संत गोरोबाकाका कुंभार प्रेरणास्थान. गोरोबाकाकांनी आयुष्यभर विठू माऊलींची सेवा केली. साहजिकच राज्यातील कुंभार समाजानेही वारीची परंपरा आवर्जून जपली आहे. कोल्हापूर शहराचाच विचार केला, तर पापाची तिकटी कुंभार मंडपातील दिंडीला यंदा एकशे एकतीस वर्षे पूर्ण होणार आहेत. विशेष म्हणजे मंडपाच्या स्थापनेपासून आजतागायत येथील मंदिरात ग्रंथांचीच पूजा केली जाते आणि सांप्रदायिक भजनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा नव्या पिढीनेही जपली आहे. यंदाच्या येथील पायी दिंडीचे प्रस्थान उद्या (शुक्रवारी) होणार आहे.

कुंभार मंडपाची स्थापना १८९१ साली झाली आणि त्याच वर्षापासून पायी वारीलाही प्रारंभ झाला. हा मंडप तसा नव्या पिढीला माहिती नसला तरी पापाची तिकटीपासून महाद्वार रोडवर प्रवेश केला की डाव्या हाताला कलामंदिर महाविद्यालयाची कमान दिसते. त्या कमानीतून आत गेलं की हा मंडप आहे. मंडपाची दगडी इमारत आजही खणखणीत आहे आणि ती लगेच लक्ष वेधून घेते. मंडपाची स्थापना करतानाच तत्कालीन वारकरी मंडळींनी मंडपात विठ्ठल व रखुमाईची मूर्ती प्रतिष्ठापना न करता संतांच्या विविध ग्रंथांच्या पूजनाचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून येथे या ग्रंथांचीच पूजा होते.

अलीकडच्या काळात मंडपात गोरोबाकाकांचे शिल्प साकारले आहे. त्याशिवाय जुनी छायाचित्रे आणि समाजातील कलाकारांनी मंडपाच्या भिंतीवर साकारलेली संतांची पोट्रेट हे या मंडपाचे खास वैशिष्ट्य आहे. पंढरपूर पायी वारीच्या परंपरेबरोबरच तुकाराम बीज सप्ताह येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. गोरोबाकाकांची पुण्यतिथी, गोकुळ अष्टमी आदी कार्यक्रम वर्षभर होतात, असे अरुण माजगावकर सांगतात. त्यांच्यासह संजय यमगर्णीकर, अंकुश यमगर्णीकर, जगदीश पाडळकर, प्रशांत भोसले, रत्नाकर पाटील, विजय वास्कर, मंथन पोवार, पृथ्वीराज पाडळकर, श्रीकृष्ण वागवेकर, मोहन माजगावकर, तानाजी पाटील, बबन वडणगेकर, शांताराम माजगावकर, सुभाष कांबळे, सुरेश किरुळकर, स्वप्नील मुळे आदींनी संयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com