
कोल्हापुरी चप्पलचे क्लस्टर व्हावे
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल करण्याची कला सोपी नाही. पारंपरिक पद्धतीने ती शिकता येत होती. आता तिचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची वेळ आली आहे. या व्यवसायातील प्रगतीसाठी कोल्हापुरी चप्पलचे क्लस्टर लवकर मार्गी लागावे, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे व्यक्त केली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त कोल्हापुरी चप्पल, मातीची भांडी व बांबू जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा प्रशासनातर्फे त्याचे आयोजन केले आहे. चप्पल लाईन येथे कार्यक्रम झाला.
शाहू महाराज म्हणाले, ‘‘कोल्हापुरी चप्पल पारंपरिक पद्धतीने या व्यवसायात काम करणाऱ्यांच्या घरोघरी तयार केले जात होते. शंभर वर्षांहून अधिक काळ त्याची परंपरा आहे. कोल्हापुरी चप्पलचा ब्रॅंड देशासह परदेशात पोचला आहे. त्याची ख्याती जगभर टिकविण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे.’’
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराज यांनी विविध क्षेत्रात देदीप्यमान काम केले आहे. या व्यवसायाची वाढ होण्यासाठी कोल्हापुरी चप्पल औद्योगिक विकास समूहाला क्लस्टरसाठी जागा मिळवून देण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत बैठक घेतली जाईल.’’
माजी उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, "कारागिरांना मालक करण्याची भूमिका आहे. क्लस्टर योजनेतून ती साधता येईल. टीडीआरच्या माध्यमातून लाखो चौरस किलोमीटर जागा उपलब्ध असून, त्यासाठी शेंडापार्कातील जागा मिळावी. तसेच लेदर टेक्नॉलॉजी विद्यापीठ सुरू झाले पाहिजे.’’
महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापुरी चप्पल केवळ आर्थिक उत्पन्नाचा विषय नसून, ही कला टिकणे आवश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी क्लस्टरसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. आमदार जयश्री जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जयेश ओसवाल, प्रदीप कापडिया, नंदकुमार गुजर उपस्थित होते. जिल्हा फूटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पोवार यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.
चप्पल खरेदीवर २० टक्के सवलत
दरम्यान, श्री. शेटे यांनी कोल्हापुरी चप्पल खरेदीवर २० टक्के सवलत जाहीर केले. कोल्हापुरी चप्पलचे विविध प्रकार दुकानांत विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर वैविध्यपूर्ण आकारातील मातीच्या भांड्यांची जत्रा कुंभार गल्लीत, तर बांबूच्या वस्तूंची जत्रा बुरुड गल्लीत भरविली आहे.
Web Title: Kolhapuri Slippers Cluster Inauguration
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..