
Kolhapur Agriculture Economy
esakal
थोडक्यात :
जैवतंत्रज्ञानातून आर्थिक समृद्धीकडे – डॉ. जी. डी. यादव यांनी कोल्हापूरसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत विकास घडवण्याचे आवाहन केले.
युवकांना रोजगारनिर्मितीकडे वळवा – जैवतंत्रज्ञान, लघुउद्योग, पाला-पाचोळ्यापासून केमिकल उत्पादन अशा नव्या क्षेत्रांत युवा पिढीने नोकरी घेण्याऐवजी नोकरी देणारे होण्याची गरज व्यक्त केली.
संशोधन, नवोन्मेष व जागतिक कल्याण – संशोधनासाठी गुंतवणूक, शेतकरी उत्पन्नवाढ, नैसर्गिक संसाधनांचा उपयोग व ऋग्वेदीय कल्याणाच्या तत्त्वांवर भर देत देशाच्या महासत्तेकडे वाटचाल करण्याचा संदेश दिला.
Kolhapur Agriculture News : ‘कृषिसंपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण शेती व शेतीपूरक व्यवसायांवरच अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काळात आता शेतीचा जैवतंत्रज्ञानाचा (ॲग्रो-बायोटेक्नॉलॉजी) वापर करून शाश्वत विकास घडवणे शक्य आहे. त्याद्वारे आर्थिक सक्षमही होता येईल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा’, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी आज येथे केले. जैवतंत्रज्ञानातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन युवा पिढीने नोकरी देणारे बनावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ’चे संस्थापक, संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘जैवतंत्रज्ञानातून आर्थिक समृद्धीकडे’ या विषयाची मांडणी केली. जैव तंत्रज्ञानाची उपयुक्तता, रोजगाराच्या संधी, देशाची महासत्तेकडील वाटचाल या विषयांवरही त्यांनी दिलखुलास संवाद साधला. पेटाळा येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात खचाखच गर्दीच्या साक्षीने त्यांचे व्याख्यान झाले.