esakal | राज्य सरकारच्या बदनामीचे उद्योग सोडा - जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

राज्य सरकारच्या बदनामीचे उद्योग सोडा - जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उतूर: खोटेनाटे आरोप करून महाआघाडीच्या सरकारला बदनाम करण्याचे डावपेच आखले जात आहेत. ईडीची चौकशी व सीबीआय पाठीमागे लावले जात आहे. यासाठी ही मंडळी शेवटच्या थराला जात आहेत. सरकारला बदनाम करण्याचे षड्‌यंत्र थांबवा; अन्यथा पुढील निवडणुकीत जनताच तुम्हाला जाब विचारील, असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिला.

हेही वाचा: चंदगड: विद्यार्थ्यांच्या कलाकारीतून साकारल्या बाप्पांच्या मूर्ती

येथील आंबेओहळ प्रकल्पाच्या पाणीपूजन व लोकार्पणावेळी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पाणीपूजन व लोकार्पण झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी स्वागत केले. मंत्री पाटील म्हणाले, ‘‘मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे आंबेओहळ प्रकल्प पूर्णत्वाला गेला आहे.

जिल्ह्यातील धामणी, सर्फनाला, नागणवाडी, उचंगी, सोनुर्ली आदी रखडलेले प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करणार आहे.’’ मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘वीस वर्षे रखडलेल्या या प्रकल्पासाठी आपल्याकडे जलसंपदा खाते असताना निधीची तरतूद केली. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.’’

खासदार मंडलिक म्हणाले, ‘‘मुश्रीफ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाला. आता जिल्ह्यातील इतर प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना प्रकल्पाला सुरवात झाली. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या काळात प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे आपल्याला आनंद झाला.’’ निरसोसी मठाचे शिवलिंगेश्वर स्वामी यांचे भाषण झाले.

या वेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, नावीद मुश्रीफ, माजी सभापती वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, मारुती घोरपडे, शिरीष देसाई, ठेकेदार संजय पाटील, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता विलास रजपूत, दिनेश खट्टे, तहसीलदार विकास अहिर यासह महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी आभार मानले.

त्यांच्यात ती दानत नाही!

भाजप सरकारला पाच वर्षांत पाण्याचा एक थेंब डविता आला नाही. उलट आंबेओहळ प्रकल्प पूर्ण होऊ नये म्हणून आडकाटी आणण्याचे काम त्यांनी केले. मी प्रकल्प पूर्ण केला, याबद्दल खरे तर चंद्रकांत पाटील यांनी मला शाबासकी द्यायला हवी होती; मात्र त्यांच्यात ती दानत नाही, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

मुश्रीफ यांचे काम कौतुकास्पद

मुश्रीफ यांनी आंबेओहळ प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अनेक बैठका घेतल्या. शासनाकडे पाठपुरावा केला. यामुळे हा प्रकल्प साकारला. याबरोबर त्यांनी साखर कारखाना उत्कृष्ट चालवल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, असे जयंत पाटील म्हणाले.

लाभक्षेत्र वाढवून देण्याचा विचार

बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी लाभक्षेत्र वाढवून देण्याबाबत नक्की विचार करणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी संबंधित खात्याकडे अर्ज करावे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

loading image
go to top