महाशिवरात्री स्पेशल : बेल आणि कवठाचे आरोग्यदायी उपाय

mahashivratri special healthy remedies for bells and warts tips healthcare marathi news
mahashivratri special healthy remedies for bells and warts tips healthcare marathi news

कोल्हापूर :  महाशिवरात्री आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोनामुळे बहुतांश शिवमंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत; त्यामुळे तेथे जाऊन दर्शन मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक भक्त घरीच राहून शिवाची उपासना मोठ्या श्रद्धेने करत आहे. आपल्या प्रत्येक सण, उत्सवामधून आरोग्याचे महत्त्व उत्तम पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धार्मिक संदेशाबरोबर आरोग्याचा मंत्रही दिलेला दिसतो. महाशिवरात्री साजरी करताना शिवाला अर्पण केल्या जाणाऱ्या बेलाच्या पानांचे, बेलाच्या झाडाचे महत्त्व मोठे आहे. बेलासोबतच आंब्याचा मोहोर वाहणे, कवठाचा रस, उसाचा रस, थंडाई पिणे आदी गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याला धार्मिकतेबरोबरच सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्तततेचा आधारही आहे. त्यातून ऊर्जानिर्मिती होते.  

ऊर्जा साठविणारी महाशिवरात्री   - 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांत बेलाच्या रोपांचे वितरण करण्याची नवी पद्धत सुरू झाली असून, तिचे अनुकरण सर्वत्र होत आहे. बेलफळावर प्रक्रिया करून विविध प्रकारची उत्पादने आता तयार होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बेलाचा रस, पेय, मुरांबा, बेलाची पोळी, चूर्ण, जेली, वडी आदी उत्पादनांचा समावेश आहे. कवठाच्या झाडापासून डिंक मिळतो. या डिंकाला प्रक्रिया उद्योगात मागणी वाढत आहे. अरेबिक डिंकाला पर्याय म्हणून त्याचा वापर वाढू लागलेला आहे. बेलफळ आणि कवठ या दोन्ही फळांचा मधुमेहावरील उपचारासाठी वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

आरोग्यदायी दृष्टिकोन... 
हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या प्रारंभीच महाशिवरात्री येते. या काळात वातावरणातील गारठा कमी होऊन उष्णता वाढू लागल्यामुळे कफदोष निर्माण होऊ शकतो. विशेषत: श्वसनमार्गाच्या तक्रारी वाढतात. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखे आजार वाढू लागतात. भूक मंदावते, या पार्श्‍वभूमीवर बेलफळ आणि कवठ ही फळे उपयुक्त ठरतात. त्यामुळेच त्यांचे पदार्थ आहारात घेणे हा आरोग्यदायी दृष्टिकोन आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील निसर्गमित्र संस्थेने पाच वर्षांपूर्वी बेल आणि कवठाची झाडे दत्तक देण्याची योजना राबवली. दहा हजारांहून अधिक रोपे तयार करून ती जिल्ह्यातील विविध ठिकाणी देण्यात आली. शहरातील बेलबाग परिसरात ५१ झाडेही लावली. त्याशिवाय या फळांपासून तयार होणाऱ्या पदार्थांची प्रात्यक्षिकेही मागणीनुसार दाखवली जात आहेत. 

ऊर्जा अन्‌ चैतन्य
 उसाचा रस उन्हाळ्यात लवकरात लवकर अधिक ऊर्जा देणारा ठरतो. उसाचा रस प्यायल्याने आम्लपित्त कमी होते, पोट साफ होते आणि लघवीचे विकारही कमी होतात. आंब्याचा मोहोर चैतन्याचे प्रतीक असला तरी त्याचा मंद सुवास अधिक ऊर्जा देतो.

फायदेशीर कवठ
 कवठाचे फळ पचनासाठी उत्तम व आरोग्यवर्धक. आतड्यातील कृमी व अतिसारावर उपयोगी. मूळव्याध, पोटातील अल्सर, रक्तशुद्धीसाठी फायदेशीर.गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी कवठाचा गर उपयोगी. झाडाची साल हृदय धडधडणे आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयोगी.  कवठाचा डिंक मधुमेहावर उपचारासाठी उपयुक्त. कवठाच्या बर्फीला मोठी मागणी. कवठाच्या बाह्य आवरणापासून सुगंधी तेल, अत्तर व कपड्याचे रंग बनवितात. बेल वाहताना सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण शिवाला अर्पण करण्याची धार्मिक भावना असली, तरी आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व आहे. 
 पोटाचे विकार, पोटफुगी, गॅसेस दूर करण्यासाठी बेलफळाच्या गराचे सरबत उपयुक्त ठरते.  महिलांच्या पाळीचे विकार, गर्भाशयाला येणारी सूज, बाळंतपणातील विकारांवर बेलफळ उपयुक्त.  मूत्रप्रवृत्ती कमी करणे आणि रक्तातील साखर कमी करण्याच्या गुणामुळे बेलाच्या पानांचा ताजा रस मधुमेह-डायबेटीसमध्ये उपयुक्त.बेलफळापासून बिल्वपंचक काढा, बिल्वादी घृत, बिल्वतेल, दशमूलारिष्ट, बिल्वालेह आदी औषधे बनवितात.

बेल आणि कवठाचे आरोग्यदायी उपयोग भरपूर आहेत आणि म्हणूनच निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून विविध कृतिशील उपक्रम होतात. बेलाचा विचार केला तर फळाचा आकार कमी-अधिक स्वरूपात आढळतो. बेलाच्या वाणाबाबतचे संशोधन राहुरी कृषी विद्यापीठात झाले आहे.
- डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com