esakal | मानाचा मुजरा भोवला: अलका कुबल,प्रिया बेर्डे, ,विजय पाटकर यांना मोठा दणका ; दहा लाख भरण्याचे आदेश 
sakal

बोलून बातमी शोधा

manacha mujra case Alka Kubal  Priya Berde Vijay Patkar Order to pay ten lakhs

तीन वर्षांनंतर याबाबत आज निकाल झाला असून संबंधितांनी न्यासाच्या खात्यामध्ये संबंधित रक्कम भरावी, असा आदेश झाला.

मानाचा मुजरा भोवला: अलका कुबल,प्रिया बेर्डे, ,विजय पाटकर यांना मोठा दणका ; दहा लाख भरण्याचे आदेश 

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मागील कार्यकारिणीने मानाचा मुजरा कार्यक्रम गैरव्यवहारातील दहा लाख ७८ हजार पाचशे त्र्यान्नव रुपये पंधरा दिवसांत  भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ही रक्कम न्यासाच्या खात्यामध्ये जमा करावेत, असा आदेश आज पीठासीन अधिकारी धर्मादाय सहआयुक्त श. ल. हेर्लेकर यांनी दिला. पंधरा दिवसात रक्कम न भरल्यास वैयक्तिकरित्या प्रत्येकाला आर्थिक नुकसानीस जबाबदार धरले जाईल, असेही आदेशात म्हटल्याचे ॲड. प्रशांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मागील कार्यकारिणीच्या वतीने तत्कालीन उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी सांगितले.


महामंडळाच्या २०१०-२०१५ या काळातील कार्यकारिणीने आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, रणजित जाधव आदींनी धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्यावर निर्णय देताना ही रक्कम न्यासाच्या खात्यातून भरावी, असे म्हटले होते. त्याविरोधात महामंडळातर्फे पुन्हा दाद मागण्यात आली आणि न्यासाच्या ‘खात्यामधून’ ऐवजी ‘खात्यामध्ये’ जमा करावी, अशा दुरुस्तीची मागणी केली.

तीन वर्षांनंतर याबाबत आज निकाल झाला असून संबंधितांनी न्यासाच्या खात्यामध्ये संबंधित रक्कम भरावी, असा आदेश झाल्याचेही ॲड. पाटील यांनी सांगितले. मागील कार्यकारिणीमध्ये अभिनेता विजय पाटकर, मिलिंद अष्टेकर, सुभाष भुरके, सतीश बिडकर, संजीव नाईक, अनिल निकम, प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, सतीश रणदिवे, अभिनेत्री प्रिया बेर्डे, अलका कुबल-आठल्ये, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती, व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांचा समावेश आहे.

संपादन- अर्चना बनगे

loading image