esakal | 'मराठा आरक्षण समतेचा लढा ; लोकप्रतिनिधीनी एकत्र यावे'
sakal

बोलून बातमी शोधा

MP Yuvraj Sambhajiraje Chhatrapati speaking at the Dussehra Maratha Mela organized by Sakal Maratha Kolhapur

समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागेल.'' 

'मराठा आरक्षण समतेचा लढा ; लोकप्रतिनिधीनी एकत्र यावे'

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : मराठा आरक्षण हा समतेचा लढा असून, तो न्यायालयीन लढाईच्या जोरावर जिंकावा लागेल, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत, असा टोला लगावत त्यांनी लोकप्रतिनिधींनी त्यांचे कार्यक्रम बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. 
सकल मराठा कोल्हापूरतर्फे आयोजित दसरा मराठा मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी मराठा आरक्षणाची आवश्‍यकता स्पष्ट करताना गरीब मराठा समाजाची स्थिती हलाखीची असल्याचे सांगितले. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात मेळाव्याचे आयोजन केले होते. 


संभाजीराजे म्हणाले, ""राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 1902ला आरक्षण दिले होते. त्यात मराठा समाजाचादेखील समावेश होता. महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या मोठी असून, 85 टक्के मराठा समाज गरीबीशी झुंज देत आहे. अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी आहेत. समाजातील मुला-मुलींना शिक्षण व नोकरीत स्थान मिळविताना संघर्ष करावा लागत आहे. एकेक गुणासाठी त्यांनी अहोरात्र अभ्यासात झोकून द्यावे लागत आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागेल.'' 

हेही वाचा- सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी :  गुरुजींची अपार माया अन् त्यांच्याच साडीने सजते माहेरवासीनीची काया -


ते म्हणाले, ""येत्या 27 ऑक्‍टोबरला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची भक्कमपणे बाजू मांडणे महत्त्वाचे आहे. मराठा समाजाने कायदा हातात न घेता न्यायालयीन लढाईला सामोरे जाण्याची ही वेळ आहे, हे लक्षात घ्यावे. कोल्हापूर जिल्हा दिशा देणारा असून, आरक्षणाच्या लढ्यासाठी जिल्ह्याने पुढाकार घ्यावा.'' 
शाहू नगरीतून उठणारा आवाज दिल्लीपर्यंत पोचतो, असेही त्यांनी सांगितले. प्रसाद जाधव यांनी मराठा समाज लढवय्या असून, आरक्षणासाठी समाजाला सीमोल्लंघन करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. 


हेही वाचा- यायला लागतय’ म्हटले की दुचाकी गाडी घेऊन तयार असणाऱ्या ट्रक मेकॅनिक ते परिवहन सभापतीचा प्रवास -


या प्रसंगी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, नगरसेवक अजित राऊत, शिवाजी जाधव, विक्रम जरग, श्रीकांत भोसले, बाबा महाडिक, बारा बलुतेदार संघटनेचे उमेश पोर्लेकर, वसंतराव वाठारकर, रणजित पोवार, संजय ओतारी, तानाजी मर्दाने, सलीम पटवेगार, शिवमूर्ती इंगळे, संदीप डोणे, अरूण नरळे, गोरख गवळी, बाळू लिंगम उपस्थित होते. 

मराठा आरक्षण मिळेपर्यंत शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर जिल्ह्याचे केंद्र असेल. तेथे मराठा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी मराठा बांधव कार्यरत राहतील. मराठा बांधवांनी तेथे संपर्क साधावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. 

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top