पावसाचा जोर, नाल्यांतील पाण्याचा घरांना घोर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Flood

कोल्हापूर शहरातील उपनगरे व काही ठिकाणी मध्यवस्तीतील नाल्यांमुळे पावसाळ्यात महापुराचा फटका बसतो. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागते, काही ठिकाणी घरांची पडझड होते.

पावसाचा जोर, नाल्यांतील पाण्याचा घरांना घोर...

कोल्हापूर शहरातील उपनगरे व काही ठिकाणी मध्यवस्तीतील नाल्यांमुळे पावसाळ्यात महापुराचा फटका बसतो. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागते, काही ठिकाणी घरांची पडझड होते. नाल्यांमुळे घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची उडणारी तारांबळ गेल्या पाच ते सहा वर्षांत पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात छोटे-मोठे असे २४ वर नाले आहेत. नाल्यांतील अतिक्रमणे, अडथळे आणि टाकलेल्या भरींमुळे पुराचा नदीपासून धोका आहेच... पण, आता नाल्यांमुळेही धोका वाढल्याचे, ज्यांना फटका बसला, त्यांच्याबरोबर बोलताना प्रकर्षाने समोर आले...

म्हणून आम्ही पूलच फोडला...

‘ती पावसाळी रात्र भयानक होती. म्हाडा कॉलनीतील घरांमध्ये शौचालयातून सांडपाणी वर येऊ लागले आणि पाहता-पाहता घरभर पसरले... पाणी वाढू लागले तसे नागरिक रस्त्यावर आले. ओढ्यातील पाणी छोट्या पुलाला टेकले...अखेर सर्वांनी मिळून तो पूलच पाडला. पाणी पुढे प्रवाही झाले... घरांतील पाणी कमी झाले... पण, नुकसान झाले ते झालेच...’ पृथ्वीराज जाधव यांनी सांगितलेला हा भयानक अनुभव पुराची भीषणात दाखवतो. मोरेवाडी ग्रामपंचायतीमधील ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे. त्यावर बांधलेला हा पूल छोटा असल्याने तो पाण्याच्या लोंढ्याला अडथळा ठरला... शहरातील बहुतेक ओढ्यांची आणि नाल्यांची स्थिती अशीच असल्याने उपनगरांत पुराचा धोका वाढला आहे...

नाल्याचे पाणी घरातूनच वाहिले

माजी नगरसेवक राजसिंह शेळके अनुभव सांगताना म्हणाले, ‘‘मुक्त सैनिक वसाहत आणि आसपासचा परिसर सखल भागात आहे. त्यामुळे महाडिक कॉलनी, रुईकर कॉलनी, कपूर वसाहत अशा चार ते पाच किलोमीटर परिसरातील पावसाचे पाणी ओढ्यातून मुक्त सैनिक वसाहत परिसरात येते. तेथून ते नदीकडे जाते. मात्र, काही वर्षांपूर्वी बांधकामासाठी ओढ्याचा मार्गच बदलला. ओढ्याची सफाई, खोलीकरण होत नाही. चार नळ्यांचा पूल आहे. त्यातील दोन नळे कचरा अडकल्याने बंद असतात. जास्त पाऊस झाला की पाण्याचा लोंढा वाट मिळेल तेथून वाहून जातो... पाणी आसपासच्या परिसरात पसरते... घरांतून शिरते... नागरिकांना घरे सोडून इतरत्र राहायला जावे लागते... प्रशासनाने ओढ्याचे खोलीकरण आणि अतिक्रमण काढायलाच हवे...’’

शाम सोसायटीचे दुखणे कायमचेच...

सुर्वेनगर, तुळजाभवानी कॉलनी, निकम पार्क, देवकर पाणंद येथील पावसाचे पाणी एका ओढ्यातून शाम सोसायटीत येते. तेथून हे पाणी उचलून शेतीसाठी सोडले जाते. पूर्वी या ओढ्यातील पाण्यात मासेमारी केली जायची... पण, आता या ओढ्यातून सांडपाणी वाहते. पावसाळ्यात या ओढ्यातील पाणी शाम सोसायटीतील घरांमध्ये शिरते. येथील रहिवासी मिथुन मगदूम सांगतात, ‘‘प्रत्येक पावसाळ्यात ओढ्याचे पाणी अंगणात येतेच. कधी-कधी पहिल्या खोलीतही येते. पाणी येऊन जाते आणि मागे दुर्गंधी राहते... प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही फारसे काही झालेले नाही... हे कायमचे दुखणे झाले आहे...’’

रामानंदनगरात नागरिकांना भीती

रामानंदनगर एक ओढा पाचगावकडून, तर दुसरा कळंब्याकडून येतो... कळंब्याकडून येणाऱ्या ओढ्यात पावसाळ्यात सांडव्यावरून वाहणारे पाणी असते; तर पाचगाव, कात्यायनी परिसरातील पाणी दुसऱ्या ओढ्यातून येते. हे दोन्ही ओढे रामानंदनगरच्या मागे एकत्र येतात. पावसाळ्यात या ओढ्यांना पूर येतो... मग मात्र पाणी येथील घरांतून शिरते. कारण ओढ्याचे पात्र कमी केले आहे... याबाबत गोविंद यळगुडकर सांगतात, ‘‘दर पावसाळ्यात पाणी घरात येते, असे नाही. पण, एकदा पाणी आले की नुकसान अधिक होते. ओढ्याचे पात्र रुंद करण्याची आवश्‍यकता आहे.’’

अडथळे, अतिक्रमणे आणि भराव

बांधकामांची खरमाती टाकली जाते. काही ठिकाणी कचरा टाकतात. नाल्यांतून झाडी वाढतात... काही ठिकाणी ओढ्याचे पात्र वळविले जाते. पूल लहान असतात. भूमिगत गटारांतून केबल, ड्रेनेजलाईन आडव्या असतात. यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी घरांतून शिरते... मुख्य नाल्यात दोन्ही बाजूंना नऊ मीटर, तर उपनाल्यात दोन्ही बाजूंना सहा मीटर कोणतेही बांधकाम करता येत नाही. तरीही अतिक्रमणे होतात. प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून ओढ्या-नाल्यांना मूळ स्वरूपात आणायला हवे...

शहरातील नाले

लक्षतीर्थ ते दुधाळी, फुलेवाडी ते दुधाळी, शिवाजी पेठ- साकोली कॉर्नर- दुधाळी, सीपीआर हॉस्पिटल- जयंती नाला, जुना बुधवार ते जयंती नाला, शुक्रवार पेठ- जामदार क्लब- पंचगंगा नदी, धैर्यप्रसाद कार्यालय- नागाळा पार्क- राजहंस प्रेस- विन्स हॉस्पिटल- पंचगंगा नदी, होलिक्रॉस हायस्कूल- रमण मळा- पंचगंगा नदी- गोकुळ कार्यालय- लाईन बझार- रेणुका मंदिर- जयंती नाला- पंचगंगा नदी, शुगर मिल- छत्रपती कॉलनी- राजाराम कारखाना- शुगर मिल- जुना शिये जकात नाका- पंचगंगा नदी, ॲपल सरस्वती- बापट कॅम्प, बावडा एसटीपी ते बापट कॅम्प, विचारेमाळ- सदर बझार- पाटोळेवाडी, मुक्त सैनिक वसाहत- बापट कॅम्प, माकडवाला वसाहत- मुक्त सैनिक वसाहत- बापट कॅम्प, टेंबलाईवाडी- विक्रमनगर- वीटभट्टी- पंचगंगा नदी, प्री आय.ए.एस ट्रेनिंग सेंटर- टाकाळा- ताराराणी विद्यापीठ- राजारामपुरी पहिली गल्ली- जिल्हा बँक- कब्रस्तान, जयंती नाला.

मोरेवाडी- विद्यापीठ- एसएससी बोर्ड- शास्त्रीनगर- जयंती नाला, कळंबा- पाचगाव- यल्लमा मंदिर- जरगनगर- यल्लम्मा मंदिर- महालक्ष्मीनगर- सावित्रीबाई फुले हॉस्पिटल- सुतारवाडा- जयंती नाला, सुर्वेनगर- तुळजाभवानी कॉलनी- निकम पार्क- देवकर पाणंद- शाम सोसायटी, कावळा नाका- न्यू शाहूपुरी- सासने ग्राउंड- कनाननगर- असेंब्ली रोड- जयंती नाला, टिंबर मार्केट- सरनाईक वसाहत- रंकाळा.

शहरातील ओढे, नाले हे नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यांचे पात्र कमी करणे, त्यात बांधकाम करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. ओढे-नाल्यांना पूर आल्यावर पाण्याचा लोंढा नैसर्गिक उताराने वाहतो. त्यामुळे पाणी घरात येते. यासाठी नाल्यांच्या पात्रातील अतिक्रमणे, अडथळे आणि भराव काढायला हवेत. तरच उपनगरातील पुराचा धोका कमी होईल.

- उदय गायकवाड, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: Onkar Dharmadhikari Writes Rain Flood Water Drainage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top