PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

Crime News : ‘फोन पे’ व्यवहार आणि कापडाच्या तुकड्याच्या आधारे पोलिसांनी पाच लाखांच्या चोरीचा सुगावा लावला. तपासात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
PhonePe transaction helped solve theft case in Kolhapur

PhonePe transaction becomes a clue in a five lakh theft case in Kolhapur

esakal

Updated on

-राजन दळवी

Theft Investigation Kolhapur : मोबाईलमधील ‘फोन पे’ व्यवहार आणि कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा धागा पकडत पन्हाळा पोलिसांनी महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथील पाच लाखांच्या जबरी चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा लावला. चोरीच्या ठिकाणी वृद्ध महिलेचे हात व तोंड बांधण्यासाठी वापरण्यात आलेले कापड आणि संशयिताने काही दिवसांपूर्वी कापड दुकानातून खरेदी केलेले कापड यातील साम्य तपासाचा महत्त्वाचा पुरावा ठरले. या प्रकरणी नंदकिशोर सदानंद महाडिक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडिक (वय २८, दोघे रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेला पाच तोळे सोन्याचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

महाडिकवाडी येथील सरदार ऊर्फ बापू महाडिक यांच्या घरी १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला होता. घरातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड व हात पांढऱ्या कापडी पट्ट्यांनी बांधून आरोपींनी त्यांच्या अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या व बुगडी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. या प्रकारात वृद्ध महिला जखमी झाली होती. याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांच्या हालचालींचा माग घेण्यात आला. मात्र गुन्ह्याच्या वेळी कोणतीही संशयित गाडी किंवा बाहेरील व्यक्ती परिसरात आल्याचे स्पष्ट होत नसल्याने पोलिसांचा संशय स्थानिक व्यक्तींकडे वळला.

तपासादरम्यान मिळालेल्या स्थानिक माहितीच्या आधारे नंदकिशोर महाडिक याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. सुरुवातीला त्याने गुन्ह्यातील सहभाग नाकारला. मात्र पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधील व्यवहारांची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी ७ सप्टेंबर रोजी एका कापड दुकानात ‘फोन पे’द्वारे पैसे अदा केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांनी संबंधित कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नंदकिशोरने दुकानातून घेतलेले कापड आणि चोरीच्या ठिकाणी वृद्ध महिलेचे हात व तोंड बांधण्यासाठी वापरलेले कापड यामध्ये साम्य असल्याचे तपासात आढळले. हा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. उपलब्ध पुरावे समोर ठेवल्यानंतर नंदकिशोर याने रमेश महाडिक याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी रमेश महाडिक यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीस गेलेले पाच तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश खोत करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक लिंगाप्पा चौखंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सलीम सनदी, सुरेश खोत, समीर मुल्ला, तौसिफ मुल्ला, शंकर पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र कांबळे, गणेश पाटील, दिगंबर चिले, सागर रोहिले व अमर चव्हाण यांच्या पथकाने तपासात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com