

Prayag Bridge Traffic
esakal
प्रयाग चिखली : प्रयाग चिखली-वरणगे पाडळीला जोडणारा आणि कोल्हापूर शहराकडे जाणारा पंचगंगा नदी संगमावरील प्रमुख प्रयाग पूल अरुंद आहे. या पुलावरून रोज वाहनधारकांची वर्दळ असते. वाढती वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता या पुलाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी प्रयाग चिखली, वरणगे-पाडळी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
तीस वर्षांपूर्वी हा पूल माजी आमदार दिग्विजय खानविलकर यांनी मंजूर केला. वरणगे-पाडळी गावाला जोडणारा पूल कळे, काटेभोगाव, कोकणातील राजापूर येथील नागरिकांना कोल्हापूरला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून या रस्ताचा वापर होऊ लागला. आज रोज अंदाजे तीन ते चार हजार छोटी-मोठी वाहने या पुलावरून प्रवास करतात. बालिंगा पुलावरून वाहतूक बंद झाल्यास या पुलावरून वाहतूक केली जाते.
हा रस्ता कोल्हापूर शहराला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून विद्यार्थी, ऊस वाहतूक करणारी मोठी वाहने आणि नागरिकांची ये-जा असते. विशेषतः ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयाग तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पूल अरुंद असल्याने समोरून अचानक एखादे वाहन आल्यास या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते व प्रवाशांचा वेळ वाया जातो. केवळ वाहतूक कोंडीच नाही, रात्रीच्या वेळी पुलावर पथदिव्यांची कोणतीही सोय नाही. तसेच पुलाचे संरक्षक कठडे काही ठिकाणी खराब झाले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
"हा पूल तब्बल ३० वर्षांपूर्वी बांधला आहे. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून, मोठी वाहने आल्यास नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नागरिकांची सुरक्षितता आणि वाढती वाहतूक लक्षात घेता या पुलाचे रुंदीकरण लवकरात लवकर व्हावे."
- रोहित रघुनाथ पाटील, सरपंच, प्रयाग चिखली
"तीर्थक्षेत्र प्रयाग येथील पुल वरणगे-पाडळी, निटवडे, यवलूज अशा गावांना जोडणारा दुवा म्हणून बांधला गेला. या पुलावरून कळे, राजापूर येथून वाहनधारक प्रवास करतात. रहदारी वाढली आहे. पुलाचे त्वरित रुंदीकरण व्हावे."
- दत्तात्रय पाटील, माजी सरपंच, पाडळी बुद्रुक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.