कोल्हापूर : सहा एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द ; पॅसेंजर बनणार एक्स्प्रेस

१५० किलोमीटरनंतर पॅसेंजर बनणार एक्स्प्रेस; सह्याद्रीसह अन्य रेल्वेंचा समावेश

Railway
Railwaysakal

कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाकडून १५० किलोमीटर अंतरापर्यंतच रेल्वे प्रवाशांना पॅसेंजर सेवा उपलब्ध असणार आहेत. त्यानंतरच्या पुढील अंतरावरील पॅसेंजरचे एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रूपांतर होणार आहे. कोल्हापूर-सह्याद्री एक्स्प्रेससह मिरज-पंढरपूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, कोल्हापूर-मणगूर, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द करण्यात होणार आहेत.

मिरजेतून सध्या पुणे विभागात सातारा-कोल्हापूर, मिरज-कुर्डूवाडी, सातारा-पुणे या पॅसेंजर गाड्या सुरू आहेत. या गाड्यांना एक्स्प्रेसचे तिकीट दर आकारले आहेत. यावरूनच नव्या धोरणांची शक्यता रेल्वे प्रवासी संघटनांकडून वर्तवली जात आहे; तर तोट्यात धावणाऱ्या पॅसेंजरसह, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना कायमचा रेड सिग्नल दिल्यामुळे अनेक गाड्या बंद आहेत. बंद एक्स्प्रेससह, पॅसेंजर सुरू करण्याची निवेदनाद्वारे मागणी विविध संघटनांकडून वारंवार रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र, प्रवाशांच्या हाती कायम निराशाच मिळत आहे. मिरजेतून धावणाऱ्या सत्तरहून अधिक गाड्यांपैकी फक्त दोन पॅसेंजर आणि १८ एक्स्प्रेस सुरू आहेत. उर्वरित पन्नासहून अधिक नव्या धोरणानुसार बंद आहेत.

ज्या मार्गावर एक्स्प्रेस गाड्या बारा महिने पूर्ण क्षमतेने धावतात, त्याच मार्गावर आणखी एक ‘हमसफर’ गाडी मिळणार आहे. सध्या दिवसाकाठी मिरज स्थानकातून १५ ते २० एक्स्प्रेस धावत आहेत. यापूर्वी म्हणजेच कोरोनापूर्वी ही संख्या सत्तरहून अधिक होती. यामध्ये बाराहून अधिक पॅसेंजर गाड्या सुरू होत्या.

कायमस्वरूपी बंद एक्स्प्रेस

  • मिरज-पंढरपूर

  • मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस

  • कोल्हापूर-सह्याद्री

  • कोल्हापूर-मणगूर

  • कोल्हापूर-बिदर

  • कोल्हापूर-सोलापूर

या पॅसेंजरचे होणार रूपांतर

  • मिरज-हुबळी

  • मिरज-कॅसलरॉक

  • मिरज-पंढरपूर

  • मिरज-कोल्हापूर

कोरोनाच्या नावाखाली बंद असलेल्या रेल्वे गाड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कोल्हापूर-सह्याद्री ही रेल्वे सुरू राहिली पाहिजे. कारण, पुण्याला जाणाऱ्यासाठी ती सोयीची आहे. विशेष म्हणजे ही गाडी सर्व स्टेशनवर थांबते. त्यामुळे ही गाडी बंद झाली तर कोल्हापूरच्या व्यापार, उद्योगासह पर्यटनालाही ‘खो’ बसण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

- जयेश ओसवाल, अरिहंत जैन फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com