esakal | गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; 52 हेक्‍टरांतील पिके मातीमोल

बोलून बातमी शोधा

गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; 52 हेक्‍टरांतील पिके मातीमोल
गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; 52 हेक्‍टरांतील पिके मातीमोल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या वळीव पाऊस गारपिटीने कागल तालुक्‍यातील अर्जुनवाडा, नंद्याळ, मुगळी, करड्याळ भागातील ५२ हेक्‍टरांतील फळपिके व भाजीपाला भुईसपाट झाला. १९० हेक्‍टरहून अधिक क्षेत्रातील उसाची पाने तुटून गवताच्या काडीप्रमाणे ऊस उभा आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. कृषी विभागाने पाहणी केली.

पाण्याची कमतरता आणि ऊसतोडीच्या कटकटीने येथील अनेक शेतकरी भाजीपाला व फळ पिकांकडे वळले आहेत; मात्र काल झालेला गारांचा पाऊस या पिकांचा काळ ठरला. अर्जुनवाडा येथे त्याचा सर्वाधिक फटका बसला. येथील सुमारे २२.१० हेक्‍टर, नंद्याळ येथील १६.३० हेक्‍टर आणि मुगळी व करड्याळ येथील १४ हेक्‍टरमधील वांगी, दोडका, काकडी, कारली, कलिंगड, कांदा, कोथिंबिर, मका, ज्वारी पिके भुईसपाट झाली. याशिवाय सुमारे १९० हेक्‍टरातील उसाची पाने गारपिटीने तुटून गेली आहेत.

हेही वाचा: ब्रेकिंग - गोकुळ रणांगण; राजू शेट्टी सत्ताधाऱ्यांसोबत

ऊस आता गवताच्या काडीप्रमाणे दिसत आहेत. त्यामुळे या गावातील लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हळदी आणि हमिदवाडा गावच्या शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. आज मुगळी येथे सरपंच कृष्णात गुरव, उपसरपंच बाबासाहेब सांगले, रामचंद्र सांगले, ग्रामसेवक वीरेंद्र मगदूम तसेच प्रदीप पाटील, विशाल कुंभार यांनी बैठका घेऊन नुकसानभरपाईची मागणी केली. कृषी अधिकारी भिंगारदेवे, तलाठी प्रदीप कांबळे, कृषी विभागाचे अधिकारी आर. जी. पाठक, अनिकेत माने, राजेंद्र कोरे, विठ्ठल खोत, सुनील बुगडे यांनी भेटी देऊन पाहणी केली.

१५ तास गारांचा खच

सोमवारी सायंकाळपासून १५ तास गारा पडल्या. त्या इतक्‍या होत्या, की सकाळी नऊ वाजताही रस्त्याकडेला त्यांचा खच पडलेला दिसत होता. आजवर कधीही अशी गारपीट झाली नसल्याचे येथील ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: अमेरिकेनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकवर याचीच धुम; ओव्हर द टॉप

"बाधित क्षेत्र असलेल्या गावांतील शेतीवर आज भेट देऊन नुकसानीचा प्रकार पाहिला. शिल्लक पिके कशी वाचवता येतील याचे तांत्रिक मार्गदर्शन कृषी विद्यापीठाचे डॉ. अशोक पिसाळ, डॉ. विलास करडे यांच्याकडून प्रत्यक्ष भेटीने घेण्यात आले. नुकसानीचा पंचनामा पूर्ण होण्यासाठी दोन-तीन दिवस अपेक्षित आहेत."

- अरुण भिंगारदेवे, तालुका कृषी अधिकारी