पाणीप्रश्नी इचलकरंजीत रास्ता रोको
इचलकरंजी : येथील गावभाग परिसरातील नागरिकांनी पाणीप्रश्नी मरगूबाई मंदिरजवळ आज रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे नदीवेस रोडवर सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. गावभाग परिसरात चार ते पाच दिवसांपासून पाणी आलेले नाही. अनेकवेळा वेळी-अवेळी पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. याबाबत सातत्याने पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आज गावभाग परिसरातील संतप्त नागरिकांनी नदीवेस रोडवरील मरगूबाई मंदिराजवळ सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले.
जोरदार घोषणाबाजी करीत शंखध्वनी केला. कर्नाटक व कागल मार्गावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे दोन्ही बाजूला काही किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाणी पुरवठा सभापती सुर्वे हे आंदोलन स्थळी आले. आंदोलकांनी विविध प्रश्न उपस्थीत केले.
पाणी पुरवठा अनियमीत होण्याचे स्पष्टीकरण सभापती सुर्वे यांनी दिले. या भागातील पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. प्रसाद काळे, महेश बेडगे, प्रमोद बचाटे, पृथ्वीराज चव्हाण, भूपाल कांबळे, फिरोज मुजावर, राजू खामकर आदींसह महिला घागरी घेवून या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.