घरफाळ्यावरील दंड आकारणीस आजऱ्यात विरोध

Refusal To Paid Fines In Ajara City Kolhapur Marathi News
Refusal To Paid Fines In Ajara City Kolhapur Marathi News

आजरा : आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असले तरी नगरपंचायत कायद्यानुसार एप्रिल ते डिंसेबरअखेर घरफाळा वसुली होणे आवश्‍यक आहे. डिसेंबरनंतर घरफाळा भरल्यास प्रतिमहिना दोन टक्के दंडाची तरतुद आहे. या विषयाला आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांनी विरोध केला. याबाबतचा ठराव जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना पाठविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांचा विषयावर पुन्हा जोरदार चर्चा झाली. हा प्रश्‍न प्रशासनाने हाताळावा, असे नगरसेवकांनी सांगितले. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. 

घरफाळ्यावर दंड आकारणीबाबत नगरसेविका अस्मिता जाधव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ही आकारणी सावकारी व्याजासारखी असल्याचे किरण कांबळे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक बाळ केसरकर यांनीही दंड आकारणीस विरोध केला. कोणत्याही प्रकारचा दंड आकारू नये, अशी मागणी उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी केली. दंड आकारणी रद्द करावी, असा ठराव घेण्यात आला. रस्त्यावर भाजी विक्रीला परवानगी न देण्याबाबतचा प्रश्‍न प्रशासनाने हाताळावा, असे सर्व नगरसेवकांनी सांगितले.

पाणीपुरवठा आणि आरोग्य अधिकारी बैठकांना उपस्थित नसतात, अशी तक्रार करत नगरसेवक अशोक चराटी यांनी निषेध नोंदवला. मुख्याधिकाऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांची पाठराखण करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. एकता कॉलनीतील जलकुंभाच्या जागेवरून नगरसेवक चराटी व संभाजी पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा देण्याचे तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने मान्य केले असून त्याबाबत ठराव झाल्याचे चराटी यांनी सांगितले. यावर पाटील यांनी सदरची जागा चराटी कुटुंबाने गावासाठी दिली आहे. त्याबाबत ठराव घ्यावा, असा आग्रह धरला. यावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांनी ग्रामपंचायतीची कागदपत्रे पाहून निर्णय घेवू, असे सांगून प्रकरणावर पडदा पाडला.

नगरपंचायतीकडून बांधकाम परवाने दिल्यानंतर नोंदीप्रमाणे बांधकाम सुरू आहे का? असा सवाल नगरसेवक पाटील यांनी उपस्थित केला. नवीन पाणी पुरवठा योजनेच्या बिलांबाबतची विचारणा नगरसेविका शुभदा जोशी यांनी केली. नगरपंचायत निधीतून एकही रूपया दिला जात नसल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. 

मच्छी विक्रीवरून तु..तु.. मैं..मैं 
रस्त्यावर होणाऱ्या मच्छी विक्रीवरून नगरसेविका सुमैय्या खेडेकर व यासिराबी लमतुरे यांच्यात शाब्दिक चकमक झडली. रस्त्यावर मासे विक्री सुरू असून याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. लमतुरे यांनी याबाबत आक्षेप घेत सर्वांना समान न्याय झाला पाहिजे, असे स्पष्ट केले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com