कोल्हापुरात Remdesivir चा काळा बाजार जोमात, प्रशासनाची हतबलता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात Remdesivir चा काळा बाजार जोमात, प्रशासनाची हतबलता

कोल्हापुरात Remdesivir चा काळा बाजार जोमात, प्रशासनाची हतबलता

कोल्हापूर : जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा (remedisiever fraud) काळाबाजार उघड होत असतानाच जिल्हा प्रशासनाच्या झोळीत मात्र अत्यल्प इंजेक्शन पडत आहेत. गेल्या दहा दिवसांत पन्नास हजारांपर्यंत मागणी असतानाही केवळ अडीच हजार इंजेक्शनची व्यवस्था प्रशासनाकडे आली आहे. मात्र, इतरत्र काळ्याबाजारातून इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रशासनालाही अनेकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काळाबाजार होत आहे, म्हणून प्रशासनाकडून ते थेट हॉस्पिटलला (hospital) पुरविण्याचा मुद्दा पुढे आला. त्यानंतर हॉस्पिटलने थेट प्रशासनाकडे इंजेक्शनची मागणी करावी आणि प्रशासनाकडून थेट हॉस्पिटलला ते पुरवठा करावे, अशी पद्धत कार्यान्वित करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आजही हॉस्पिटलमधील डॉक्टर इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगताहेत. रुग्णांचे नातेवाईकही इंजेक्शन चढ्या दराने काळ्याबाजारातून उपलब्ध करीत असल्याची स्थिती आहे.

जिल्हा प्रशासनाने तसेच तीन मंत्र्यांनी, तीन खासदारांनी ताकद लावली तर जिल्हा प्रशासनाकडील कोटा काही प्रमाणात तरी वाढू शकेल काय, याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. रोज पाच-सहा हजार इंजेक्शनची मागणी खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमधून होत आहे. प्रत्यक्षात शंभरीच्या आतबाहेरच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वांनाच इंजेक्शन देता येत नाही. परिणामी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्‍यक्तींच्या घरी संपर्क साधायचा. तुमच्याकडे काही रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध आहे काय, याचीही विचारणा केली जाते. त्यांच्याकडे ते शिल्लक असेल तर त्याचीही किंमत अव्वाच्या सव्वा सांगितली जाते. मात्र गरज असल्यामुळे आणि डॉक्टरांनी ते इंजेक्शन पाहिजेच म्हणून सांगितल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक वाट्टेल ती किंमत मोजत असल्याची स्थिती आहे.

  • तारीख मागणी प्रत्यक्षात उपलब्ध

  • १ मे ५७८६ ३००

  • २ मे ३१८१ ३६०

  • ३ मे ५३३१ १०२

  • ४ मे ६३६३ ५३०

  • ५ मे ६४९० ५५३

  • ६ मे ५८०२ ४२

  • ७ मे ६०५३ ५१२

  • ८ मे ५९६५ ७५

  • ९ मे ५२०८ १३२

  • एकूण ५०१७९ २६०६

टॅग्स :Kolhapurcovid-19