esakal | 'RTE' प्रवेशास विद्यार्थ्यांची पाठ; रिक्त जागांसाठी नवी प्रवेशप्रक्रिया?
sakal

बोलून बातमी शोधा

rte

रिक्त जागांसाठी आता नवी प्रवेशप्रक्रिया राबवणार की चौथ्यांदा मुदतवाढ देणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

'RTE' प्रवेशास विद्यार्थ्यांची पाठ; रिक्त जागांसाठी नवी प्रवेशप्रक्रिया?

sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : तीन वेळा मुदतवाढनंतरही हातकणंगले तालुक्यात आरटीईच्या 24.54 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. कोरोनामुळे पहिल्यांदाच आरटीई प्रवेशाच्या रिक्त जागा विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. मुदतवाढ दिल्यानंतरही प्रवेश घेण्यास अनेकजण शाळांकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. रिक्त जागांसाठी आता नवी प्रवेशप्रक्रिया राबवणार की चौथ्यांदा मुदतवाढ देणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतात. आरटीईअंतर्गत तालुक्यातील सुमारे 85 शाळांमध्ये 554 जागा यंदा उपलब्ध आहेत. शिक्षण विभागाने मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये 529 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर केले होते. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू करून ११ ते ३० जूनदरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या मुदतीत 396 विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले होते.

हेही वाचा: गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

प्रवेशाची मंदावलेली गती पाहता प्रवेशांसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत होती. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देत २३ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, या मुदतीनंतरही प्रवेश शिल्लक राहिल्याने उर्वरित जागा भरण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर निर्माण झाले. पुन्हा तिसऱ्यांदा 31 जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया तिसऱ्यांदा वाढवण्यात आली. ही मुदत संपल्याने तालुक्यात एकूण 136 जागा रिक्त आहेत.

आतापर्यंत 418 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले आहे. सुरुवातीला कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि नंतर तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेश कमी झाल्याचे दिसत आहे. शासनाने खासगी शाळांना आरटीई प्रवेशाच्या परताव्यातील रक्कम कपात केल्याने आणि मागील परतावाच पूर्ण न दिल्याने शिक्षण संस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, या मुदवाढीमुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या बालकांच्या पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे प्रवेश निश्चित होऊनही अनेकजण प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत. तर दुसरीकडे अनेकजण आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा: न्यूझीलंड : सुपरमार्केटमध्ये हल्ला; 60 सेकंदात दहशतवाद्याचा खात्मा

नापसंती शाळेचा परिणाम

लकी ड्रॉ पद्धतीने आरटीईच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सोडत काढली जाते. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या बालकांसाठी हवी ती शाळा मिळत नाही.दरवर्षी याचा फारसा परिणाम दिसत नसून प्रवेश घेतले जातात. यंदा मात्र याचा अधिक परिणाम जाणवत असल्याचे सांगण्यात आले आहे.पसंतीची शाळा न मिळल्याने अनेकजण प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत.

अशी आहे स्थिती

  • नोंदणीकृत शाळा - 85

  • आरक्षित जागा - 554

  • प्रवेश निश्चित - 418

  • रिक्त जागा - 136

loading image
go to top