संभाजीराजेंच्या लढ्याला यश; उद्याचा बंद मागे, दसरा चौकात घोषणाबाजी

सकाळी संताप; सायंकाळी जल्लोष
Sambhaji Raje health deteriorated withdrawa tomorrow shutdown Success
Sambhaji Raje health deteriorated withdrawa tomorrow shutdown Success sakal

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा समाजाने सकाळी संताप, तर मागण्या मान्य झाल्यानंतर सायंकाळी आनंदोत्सव साजरा केला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, संभाजीराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत दसरा चौक दणाणून सोडला. आतषबाजीत साखर पेढे वाटप केले. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याने बुधवारी (ता. २) दिलेली बंदची हाक मागे घेतली.

संभाजीराजेंची आज तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी केली. त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती वाऱ्यासारखी राज्यात पसरली. कोल्हापुरातील कार्यकर्त्यांचा पारा चढला. रंकाळा टॉवर येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरुद्ध टीकेची झोड उठवली. त्यामुळे येथे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. शालिनी पॅलेसपर्यंत वाहनांची रांग लगली.दसरा चौकातील स्टेजकडे सकाळी नऊपासूनच कार्यकर्ते येत राहिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी उपोषणास पाठिंबा देत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. भाजपने मराठा समाजाला दिलेले आरक्षण आघाडी सरकारला टिकवता आले नाही, असा आरोप केला. त्यानंतर पेठा-पेठांसह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या गर्दीने चौक फुलला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवतीकडे करून रास्ता रोको आंदोलन केले. एक मराठा लाख मराठा, संभाजीराजांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनी चौक दणाणून गेला. आमदार विनय कोरे म्हणाले, ‘‘मराठा समाजाचे सामजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात मागासलेपण जाणवत आहे. त्यांच्या मागण्यांची केवळ चर्चा होते. अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केली जाते. राजेंची सरकारने फसवणूक केली आहे. त्यामुळे ते आत्मक्लेश करत आहेत. त्यांचा लढा भूमीपुत्राचा लढा आहे.’’काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, ‘‘सर्व पक्ष व जाती धर्माचे लोक संभाजीराजे यांना पाठिंबा देत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना ते भेटून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जर तोडगा निघाला नाहीतर राष्ट्रीय महामार्ग बंद करू.’’

शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, ‘‘राजेंच्या पाठीशी शिवाजी पेठ आहे. महाआघाडी सरकार असो की भाजप सरकार आम्ही आमच्या हक्कासाठी आक्रमकपणे आंदोलन करत आलो आहोत. आता जर मागण्या मान्य केल्या नाहीतर मराठ्यांचा हिसका दाखवू.’’कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी उद्या (ता. १) व्यापारी वर्ग दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. या वेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, उद्योजक व्ही. बी. पाटील, शिवाजी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष अजित राऊत, वसंत मुळीक, महेश जाधव, माजी नगरसेवक अशोक जाधव, ईश्वर परमार, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, अजित ठाणेकर, अजिंक्य चव्हाण, सुनील मोदी, अर्जुन माने, मधुकर रामाणे, दिलीप पाटील, सचिन तोडकर, राजू लिंग्रस, श्रीकांत घोडके, हर्षल सुर्वे, किसन भोसले, अनिल घाटगे, प्रसाद जाधव, रुपेश पाटील, दिलीप सावंत, बाळ घाटगे, अजय पाटील, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, डॉ. डी. आर. मोरे उपस्थित होते.

दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर रिक्षाचालकांनी शहर परिसरात रिक्षा फेरी काढून आंदोलनास पाठिंबा दिला. दुपारी साडेचार वाजता समाजाने मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेऊन बुधवारी (ता. २) कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानंतर सर्व जण जिल्हा अधीक्षकांच्या भेटीला गेले. काही वेळातच मागण्या मान्य होऊन संभाजीराजे यांनी उपोषण स्थगित केल्याचे कळताच आनंदोत्सव केला.

दिवसभर आंदोलन

दरम्यान, आज दिवसभर खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केले. इचलकरंजी, कुरुंदवाड, हळदी, बोरपाडळे फाट्यावर आंदोलन करण्यात आले.

राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार

जयसिंगपूर : मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरात साखर पेढे वाटप केले. माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव-घुणकीकर यांनी मनोगत व्यक्त केले. क्रांती चौकातील श्रीमंत जयसिंग महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून आनंदोत्सव साजरा केला. सागर मादनाईक, नितीन बागे, बजरंग खामकर, अशोक घोरपडे, शंकर नाळे, संजय चव्हाण, अभिजित भांदिगरे, विकास देवाळे अक्षय पाटील, सागर माने, अमर राजिगरे, धीरज सावंत, रणवीर शिंदे, अशोक पाटील, सचिन मिसाळ, अक्षय साळोखे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

राजर्षी शाहू, छत्रपती शिवरायांना अभिवादन

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी संभाजीराजे यांचे जोरदार स्वागत करायला हवे, असे सांगितले. तसेच स्वागतासाठी समाजघटकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. त्यानंतर सकल मराठा समाजाने नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळी व छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन अभिवादन केले.

उभा मारुती चौकात पेढे वाटप

शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात शाहू महाराज यांच्या हस्ते साखर व पेढे वाटण्यात आले. या वेळी सुजीत चव्हाण, अजित राऊत, प्रसाद जाधव, लालासाहेब गायकवाड, महेश जाधव, राजेंद्र चव्हाण, पंडित बोंद्रे, श्रीकांत भोसले, आबा जागदाळे, दिलीप सावंत, विजय माने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com