जोतिबा येथे सरता रविवार सोहळा

पालखी सोहळ्याला लोटला अख्खा गाव; ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा
Palkhi ceremony At Jyotiba mountain
Palkhi ceremony At Jyotiba mountainSakal

जोतिबा डोंगर - वर्षभर भाविकांच्या सेवेत असणारा जोतिबा डोंगर येथील पुजारी ग्रामस्थ आज मात्र सरता रविवार व पालखी सोहळा या निमित्ताने एकत्र आले आणि सर्वांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. ग्रामस्थांनी नवीन कपडे, दागिने, साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पुरणपोळ्या लाटणाऱ्या पुजारी महिलांनी आज देवाला नैवेद्य म्हणून आमरस व पुरणपोळी करून ‘श्रीं’ना नैवेद्य दाखविण्यासाठी त्या नटूनथटून मंदिरात आल्या. जोतिबावर आजचा हा पालखी सोहळा शेवटचा असतो. पावसाळ्यात चार महिने हा सोहळा पूर्णपणे बंद असतो.

मानाचे उंट-घोडेही डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे गावात विश्रांतीसाठी पाठवले जातात. पुन्हा हा पालखी सोहळा खंडेनवमीला सुरू होईल. आज सरता रविवार सोहळ्यानिमित्त जोतिबाची पालखी विविधरंगी फुलांनी सजली गेली. मानाचे उंट-घोडे ही सजवले गेले. रात्री आठ वाजता सूचनेची महाघंटा वाजवली आणि अख्खा गाव मंदिराच्या दिशेने येऊ लागला.‘चांगभलं’चा जयघोष झाला. गुलाल-खोबऱ्याची उधळण झाली आणि मंदिराभोवती पालखी सोहळा सुरू झाला. पालखीचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी महिला व आबालवृद्धांची गर्दी झाली.

पालखीच्या मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सदरेवर विराजमान झाली. त्यानंतर गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी, विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते गायली. त्यानंतर मधू महालदार यांनी वैशिष्ट्यपूर्ण हाळी दिल्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. सरपंच राधा बुणे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, अधीक्षक दीपक म्हेतर, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, माजी सभापती विष्णुपंत दादर्णे, कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, साहाय्यक उपपोलिस निरीक्षक मनोज कदम, सिंदीया देवस्थानचे अधीक्षक अजित झुगर आदी उपस्थित होते.

डोंगरावर दोन वर्षांनंतर झालेला हा सरत्या रविवारचा पालखी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. हा पालखी सोहळा पाहून समाधान वाटले. मी देवाचा निस्मीम भक्त. यंदा मी कोल्हापुरातून पायी पाच खेटे पूर्ण केले.

- सुभाष पाटील, भाविक, हणमंतवाडी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com