Exam Result : आधी ‘पास’ नंतर ‘नापास’; विद्यापीठाच्या निकालातील चुकीचा विद्यार्थ्याला फटका

शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रातील एका विद्यार्थ्याने बी.कॉम. अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्याचा निकाल पहिल्यांदा उत्तीर्ण म्हणून आला.
Shivaji University
Shivaji Universitysakal

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रातील एका विद्यार्थ्याने बी.कॉम. अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्याचा निकाल पहिल्यांदा उत्तीर्ण म्हणून आला. त्याची छापील प्रत आणि तात्पुरते पदवी प्रमाणपत्रदेखील त्याला मिळाले. त्यावर खासगी क्षेत्रातील नव्या नोकरीसाठी अर्ज केला आणि त्याला नोकरीही मिळाली. पण, बारा दिवसांत पुन्हा त्याचा निकाल अनुत्तीर्ण म्हणून जाहीर झाला आहे. निकालातील या चुकीचा त्याला फटका बसत आहे.

या विद्यार्थ्याने बी.कॉम. अंतिम वर्षाच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा मे-जूनदरम्यान दिली. त्याचा निकाल २ जुलै रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ऑनलाईन जाहीर केला. त्यात हा विद्यार्थी पास झाला होता. एका विषयात कमी गुण होते.

त्याबाबत दूरशिक्षण विभागाचे केंद्र असलेल्या महाविद्यालयात आणि विद्यापीठात त्याने विचारणा केली असता, त्याला ‘तुम्हाला ग्रेस गुण मिळाले असून, तुम्ही पास झाला आहात’, असे सांगण्यात आले. यानंतर दूरशिक्षण केंद्रातून या विद्यार्थ्याने मूळ गुणपत्रिका घेतली. विद्यापीठाच्या ऑनलाईन पोर्टलवरून त्याने तात्पुरते (प्रोव्हिजनल) पदवी प्रमाणपत्रदेखील डाउनलोड करून घेतले. त्यामध्येही उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख होता.

पदवी परीक्षेत पास झाल्याने खासगी क्षेत्रातील सध्या कार्यरत असलेल्या कंपनीतून सेवामुक्त होऊन हा विद्यार्थी नव्या कंपनीत रुजू झाला. दरम्यान, त्याने स्पर्धा परीक्षेचा अर्जही भरला. त्यासाठी तो जेव्हा पदवी प्रमाणपत्राचा अर्ज करण्याची माहिती घेण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी दूरशिक्षण केंद्रामध्ये गेला. त्यावर त्याला सांगण्यात आले की, तुम्ही नापास झाला आहात आणि संबंधित निकाल १४ जुलै रोजी अद्ययावत केला आहे.

मात्र, प्रत्यक्षात संबंधित निकाल ४ ऑगस्ट रोजी अद्ययावत केल्याचे या विद्यार्थ्याच्या पाहण्यात आले. त्याने याबाबत परीक्षा मंडळात विचारणा केली असता, ही मनुष्यपातळीवर चूक झाली असून, तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल, असे सांगितले आहे. चूक विद्यापीठाची असताना त्रास मात्र या विद्यार्थ्याला सहन करावा लागत आहे.

मला न्याय द्या

निकाल आणि प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणून मिळाल्याने मी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज केला. नव्या कंपनीत रुजू झालो. आता कागदपत्रे पडताळणी होईल. तेव्हा माझी अडचण होणार आहे. मला आधीच नापास म्हणून निकाल मिळाला असता, तर मी पुढील प्रक्रिया केली नसती.

माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. माझी कोणतीही चूक नसताना मला मानसिक त्रास होत आहे. ते लक्षात घेऊन योग्य तो न्याय देण्याची मागणी संबंधित विद्यार्थ्याने केली. त्याने याबाबतचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (ता. २३) दिले आहे.

शिवाजी विद्यापीठाची चूक असताना संबंधित विद्यार्थ्याला नाहक त्रास होत आहे. या भोंगळ कारभाराबाबत दोषींवर कारवाई झाली पाहिजे. संबंधित विद्यार्थ्याला विद्यापीठाने न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

- अक्षय शेळके, अध्यक्ष, एनएसयुआय, कोल्हापूर

या निकालाबाबतची माहिती घेतली आहे. संबंधित विद्यार्थ्याशी चर्चा केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. विद्यार्थ्याला योग्य न्याय देण्यात येईल.

- डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा मंडळ, शिवाजी विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com