
त्यांनी माझ्यासह काँग्रेसची काळजी करू नये;आ. पी. एन. पाटील
कोल्हापूर : चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केला नाही. गांधी, नेहरू घराणे व काँग्रेसचा मी सच्चा पाईक असून, काँग्रेससाठीच आजन्म कार्यरत राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस व आमच्याबाबत दुसऱ्या कोणी काळजी करण्याची गरज नाही, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीवरून आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘‘युवक काँग्रेसपासून राष्ट्रीय समितीपर्यंत काम केले आहे. प्रामाणिकपणे समाजाच्या तळागाळापर्यंत पक्षाचे विचार पोहोचविले. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ अखंडितपणे सद्भावना दौडचे आयोजन करत आहे. काँग्रेसच्या माध्यमातून विविध संस्थांची उभारणी करून हजारो हातांना काम दिले आहे. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले, मात्र काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केलेला नाही. अथवा पक्षाशी गद्दारी केलेली नाही.’’
दिल्लीत ४ व ५ एप्रिलला संसदेच्या पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी संस्थेमार्फत अभ्यास दौऱ्यासाठी दिल्लीला जाणार आहोत. यावेळी पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी माझ्यासह अन्य आमदारांनी वेळ मागितली आहे. त्यामध्ये नाराजीचा संबंध नाही, मात्र या बाबीचा विपर्यास केला आहे, हे चुकीचे आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.
Web Title: Should Not Worry Congress Me P N Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..