Kolhapur : घाबरून जाऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kidnapping

Kolhapur : कोल्हापूरकर घाबरून जाऊ नका मुले पळविणारी टोळी कोल्हापूर मध्ये बातमी खोटी

कोल्हापूर : मुले पळविणारी टोळी बालिंगा परिसरात... चौकशी करताना महिला गायब झाली आहे. सावधान! तुमच्या मुलांना सांभाळा, रात्री दरवाजा उघडू नका, शंका वाटल्यास इतरांना सतर्क करा, अशा काही पोस्ट आणि मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका... या पोस्ट आणि मॅसेज फॉरवर्डही करू नका. कारण त्या बनावट, खोट्या आहेत.

या पोस्टमध्ये दोन महिलांची छायाचित्रेही आहेत. शाळा, कॉलनीतील मुलांना ती पळवून नेत असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे. सर्व शाळांच्या ग्रुपवरही पोस्ट व्हायरल करा, असेही आवाहन केले आहे. तसेच, बसमध्ये बसलेल्या या महिलेस खाली उतरविले जात आहे. काही पोलिसही बाजूला आहेत. रस्त्यावर एक तरुण लहान मुलाला घेऊन थांबला. तेथे पोलिस आणि संबंधित संशयित महिलाही असल्याची व्हिडिओ पोस्ट व्हायरल केली. तसेच, ‘अपने बच्चे को बचाओ’ असे लिहिलेले आणि महिला लहान मुलांना पळवून घेऊन जात असल्याचेही ‘पोस्टर’ व्हायरल झाले आहे.

तसेच, विरार (ठाणे)मध्ये लहान मुलांना पळविण्याचे प्रकार खूप वाढले आहेत, तरी पालकांनी मुलांची काळजी घ्यावी. सोसायटीत जाता-येता प्रवेशद्वार जरूर बंद करावे. फेरीवाल्यांना सोसायटी आवारात घेऊ नये, असाही मॅसेज फिरत आहे. तसेच, भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी होत असलेल्या टीव्हीवरील ब्रेकिंग न्यूजचेही छायाचित्र व्हायरल झाले आहे. अर्धा डझन मॅसेज-पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत.यातील काही पोस्ट परराज्यांतीलही आहेत. त्याला स्थानिक संदर्भ दिले जात आहेत. चोऱ्याही वाढल्या असून, त्यातूनही मुले पळविण्याची भीती असल्याचेही पोस्टमधून सांगण्यात येते.

सोशल मीडियावरील या पोस्ट आणि मॅसेजची आम्ही खात्री केली, तेव्हा या पोस्ट चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, ठराविक वर्गातील महिलांचेच छायाचित्र या वेगवेगळ्या पोस्टमध्येही दिसून येते. त्यामुळे जाणीवपूर्वक या पोस्ट व्हायरल होत असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले.

मुले पळविणारी टोळी शहरासह जिल्ह्यात कोठेही कार्यरत नाही. सोशल मीडियावरील पोस्ट या ‘फेक’ (बनावट) आहेत. या पोस्ट व्हायरल करू नयेत. त्याचा कोल्हापूर शहरासह बालिंग्याचा कोणताही संदर्भ नाही.

- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक