कोल्हापूरची पोरं हुश्शार! कॅन्सरचे निदान आता काही मिनिटांतच होणार

कोल्हापूरच्या तरुणाने बनविले सॉफ्टवेअर; वेळ आणि खर्चात होणार बचत
कोल्हापूरची पोरं हुश्शार! कॅन्सरचे निदान आता काही मिनिटांतच होणार

कोल्हापूर : रुग्णाची बायोप्सी केल्यानंतर पॅथॉलॉजिस्ट तपासणी करून कर्करोगाचे निदान केले जाते, मात्र त्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो, मात्र आता काही मिनिटांतच निदान होणे शक्‍य झाले आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या डॉ. जयेंद्र रवींद्र शिंदे आणि चंद्रपूरच्या डॉ. केतन श्रीकांत बच्चुवार यांनी 'क्रॉसस्कोप डी. एक्‍स' हे सॉफ्टवेअर बनवले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ‘टिशू बायोस्पीचे इमेज’च्या आधारे काही मिनिटांमध्ये कर्करोगाचे निदान समजते. क्रॉसस्कोप ही या दोघांची अमेरिकास्थित कंपनी आहे. या कंपनीने हे सॉफ्टरवेअर बनवले असून, त्याद्वारे कर्करोग निदानाचा वेळ आणि खर्च कमी होणार आहे.

लवकर निदान न झाल्याने शरीरात कर्करोगाचा फैलाव होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. डॉक्‍टरांनी तपासणी करणे, तपासणीनंतरची प्रक्रिया होऊन कर्करोगाचे निदान होणे, ही वेळ लावणारी प्रक्रिया आहे. रुग्णाच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी कर्करोगाचा फैलाव झाल्याची शक्‍यता असते, त्या भागाची बायोप्सी करून गाठीचा तुकडा पॅथॅलॉजिस्टकडे पाठवली जातो. त्यानंतर हे पॅथॅलॉजिस्ट मायक्रोस्कोपखाली त्याचे परीक्षण करून निदान करतात, निष्णात पॅथॉलॉजिस्टची संख्या मर्यादित असल्याने या प्रक्रियेला वेळ लागतो. तसेच या पारंपरिक प्रक्रियेसाठी येणारा खर्चही मोठा आहे. ही समस्या लक्षात घेऊन जयेंद्र आणि केतन यांनी 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'चा वापर करून शरीरातील कर्करोगाचे निदान करणारे सॉफ्टवेअर बनवण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी कर्करोगाचा जगभरातील डाटा अभ्यासला. यातून हे सॉफ्टवेअर बनवण्यात आले.

शरीरातील बायोप्सीचे 'टिशू बायोप्सी इमेज' बनवूनही ती सॉफ्टवेअरला फिड केली जाते. त्यानंतर काही मिनिटांत त्या रुग्णाला कर्करोग आहे की नाही, हे समजते. कर्करोग असल्यास तो कोणत्याचा स्वरूपाचा आहे. शरीरात त्याचा फैलाव किती झाला आहे. किती दिवसांनी कर्करोग कोणत्या स्टेजला जाईल. त्यासाठी कोणती उपचार पद्धती केली पाहिजे. या सर्व गोष्टींची माहिती हे सॉफ्टवेअर देते. या सॉफ्टवेअरच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, सध्या याची अचूकता ९४ टक्के इतकी आहे. क्रॉसस्कोप स्टार्टअपची निवड बॉस्टनमधील जगप्रसिद्ध टेकस्टार्स या ॲक्‍सिलरेटर प्रोग्रॅममध्ये झाली. त्यांनी १ कोटी रुपयांचे फंडिंग क्रॉसस्कोप कंपनीला दिले आहे.

जयेंद्र शिंदे यांच्याविषयी

जयेंद्र यांचे वडील रवींद्र शिंदे यांची पॅथॅलॉजी लॅब आहे. जयेंद्र यांनी न्यू मॉडेल आणि विवेकानंद महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून बायोइन्फॉरमेटिक्‍स या विषयातून एमएससी. केले. फ्रान्स येथील इनसर्म महाविद्यालयातून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर स्टॅंडफोर्ड विद्यापीठातून पोस्ट डॉक्‍टरेट केले. सिलिकॉनव्हॅली येथील क्रॉसस्कोप कंपनीच्या माध्यमातून त्यांनी क्रॉसस्कोप डी.एक्‍स हे सॉफ्टवेअर बनवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com