SSC Exam 2023: आजच पाहा केंद्र, बैठक व्यवस्था, वेळ अन्‌ टाळा ऐनवेळची धावपळ|ssc exam 2023 exam center student kolhapur holl ticket issue education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ssc exam 2023 exam center student kolhapur holl ticket issue education

SSC Exam 2023: आजच पाहा केंद्र, बैठक व्यवस्था, वेळ अन्‌ टाळा ऐनवेळची धावपळ

कोल्हापूर : परीक्षा केंद्राचे पूर्ण नाव नसणे, उपकेंद्राचा उल्लेख नाही, अशा प्रवेशपत्रावरील (हॉल तिकीट) अपुऱ्या माहितीमुळे बारावीच्या पहिल्या पेपरला केंद्र शोधताना परीक्षार्थींची धावपळ झाली. ते आपल्याबाबत घडू नये यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची उद्या, बुधवारी माहिती घ्यावी. दहावीची परीक्षा गुरुवार (ता. २ मार्च) पासून सुरू होणार आहे.

या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जिल्ह्यात १३६ परीक्षा केंद्रे निश्‍चित केली आहेत. त्यात मुख्य, उपकेंद्रांचा समावेश आहे. प्रवेशपत्रावर अनेकदा केंद्राचे पूर्ण नाव, पत्ता, उपकेंद्राचा उल्लेख नसतो.

काही शाळांची नावे एकसारखी आहेत. त्यामुळे अगदी पेपरच्या दिवशी थेट केंद्राच्या ठिकाणी गेल्यास धावपळ करावी लागते. त्याचा परिणाम पेपर सोडविण्यावर होतो. ते टाळण्यासाठी परीक्षेच्या एक दिवस आधी बुधवारी विद्यार्थी, पालकांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची माहिती घ्यावी.

दरम्यान, जिल्ह्यातील ९७६ शाळांतील ५३,६७५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. या परीक्षेचा प्रारंभ गुरुवारी सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, शिक्षण मंडळ आणि विद्यार्थ्यांची तयारी वेगाने सुरू आहे.

‘बारावी’च्या ६ लाख उत्तरपत्रिका तपासणी ठप्प

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका मूल्यमापन (तपासणी) कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील सुमारे ६ लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम ठप्प झाले आहे.

आतापर्यंत बारावीचे पाच पेपर झाले आहेत. आंदोलनकर्ते शिक्षकांचा महासंघ आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर निर्णय होऊन उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांनी केंद्रावर वेळेत पोहोचावे

बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठी काही नियमात शिक्षण मंडळाने सुधारणा केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रातील पेपरसाठी साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीच वाजता या निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावे.

त्यांची बैठक व्यवस्था असलेल्या केंद्राची माहिती बुधवारी जाणून घ्यावी. परीक्षेची तयारी शिक्षण मंडळाकडून पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय प्रभारी सचिव डी. एस. पवार यांनी दिली.