
Jinsen Math Nandani : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २८) फेटाळल्याने ‘महादेवी’ हत्तीण गुजरातमधील वनतारा हत्ती केंद्राकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाले. रात्री साडेअकराच्या सुमारास ‘महादेवी हत्तीणी’ला मिरवणुकीने नेत असताना काही तरुणांनी दोन पोलिस गाड्यांवर दगडफेक केली व प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यात काही जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी हत्तीणीला निशिदीकेजवळ नेले. रात्री सव्वाबारा वाजता ‘ॲनिमल ॲम्बुलन्स’मधून महादेवी गुजरातच्या केंद्राकडे रवाना झाली.