esakal | खचायचं नाही, लढायचं : अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले तरी कृषी केंद्रातून सेवा, आळवेतील प्रज्ञाचा खडतर प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

खचायचं नाही, लढायचं : अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले तरी कृषी केंद्रातून सेवा

खचायचं नाही, लढायचं : अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले तरी कृषी केंद्रातून सेवा

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : हायस्कुलपासूनच तिचे अधिकारी बनण्याचे स्वप्न, शिकून काही तरी बनून दाखवावं, असा तिने चंगच बांधला. बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण करत बी.एस्सी.अँग्रीचे (B.sc agri) शिक्षण घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. बँकिंगच्या (banking) परीक्षेचा अभ्यास करत ती मुख्य परीक्षेपर्यंत पोहचली. मात्र एक दोन मार्कांनी हुलकावणी यश देत होतं. नंतर ती लग्नबंधनात अडकली. पण स्वस्थ न बसता सासरी तिने कृषी सेवा केंद्र सुरु केले. (agricultural center) यातून ती शेतकऱ्यांना शेतीविषयक सेवा पुरवत आहे. ही यशकथा आहे. आळवे (ता. पन्हाळा) येथील प्रज्ञा कांबळे (pradhya kambale) हिची. अपयशाला कुरवाळत न बसता आपल्या शिक्षणाचा वापर करुन ती स्वतःला सिद्ध करु पाहत आहे. अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून असलेली प्रज्ञा कृषी मार्गदर्शन व सेवा पुवठ्याच काम करत खचलेल्या तरुण तरुणींना प्रेरणा देण्याचं काम करते.

अतिग्रे (aatigre) (ता. हातकणंगले) गावात सामान्य कुटूंबात प्रज्ञा वाढली. वडील भिमराव कांबळे ड्राइविंगचे काम करतात. मुलीने शिकून ऑफीसर व्हावे. या भावनेने तिला काही कमी पडू दिले नाही. २०१२ ला तिने बी.एस.सी अॅग्रीसाठी प्रवेश अर्ज घेतला. परभणी विद्यापीठात तिचा प्रवेश नक्की झाला. मुलीला दूर कसं पाठवायचं? हा प्रश्न आईवडिलांसमोर होताच. पण प्रज्ञाची शिकण्याची उमेद होती. ती परभणीला रवाना झाली. वडील येथून तिला पैसे पाठवत होते. २०१६ ला प्राविण्यासह ती कृषी पदवीधर झाली. ती घरी परतली. पुढील अभ्यासासाठी तिला मार्गदर्शनाची गरज होती पण खर्च नको म्हणून सेल्फ स्टडी करण्याचे ठरवले. इंटरनेटच्या मदतीने अभ्यास सुरु ठेवला. पहिल्याच प्रयत्नात एसबीआय बँकेंच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. केवळ एका मार्काने तिच्या पदरी अपयश आले. पुढे अभ्यास कायम ठेवला पण स्पर्धा वाढली. यश थोडक्यात चुकत होतं.

हेही वाचा: जिद्द असावी तर अशी! चहा दुकान, कॅफे ते जाहिरात कंपनीचा मालक

गेल्या वर्षी घरच्यांनी प्रज्ञाच्या लग्नाचा निर्णय घेतला.आळवे (ता. पन्हाळा) येथील प्रशांत कांबळे यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली. सोशल वर्क विषयातून प्रशांतचे उच्च शिक्षण झाले आहे. प्रज्ञाच्या स्पर्धात्मक लढाईत तेही तिला बळ देत होते. पण स्पर्धा परीक्षेची अनिश्चितता तिला जाणवत होती. इतरत्र नोकरी करण्यापेक्षा कृषी शिक्षणाचा प्रत्यक्षात उपयोग करावा, अशी तिला कल्पना सुचली. घरच्या शेतातलं उत्पादन कसं वाढेल याकडे ती लक्ष देवू लागली. कृषीचं महत्त्व वाढत असताना तिने गावातच कृषी सेवा केंद्र सुरु करण्याचे ठरवले. पती, सासु-सासरे यांनी तिला पाठबळ दिले. कृषी केंद्र सुरु करत प्रज्ञा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. परिसरातल्या शेतकऱ्यांना तिच्या कृषी केंद्रातून खत, औषधांचा पुरवठा करते.

"स्पर्धा प्रचंड वाढली आहे. नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी घरच्या शेतीत विविध प्रयोग करावे. आपल्या शिक्षणाशी पुरक व्यवसाय ऊभा करावा. यातून नवे समाधान व यश नक्की मिळते."

- प्रज्ञा कांबळे

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

loading image