esakal | साखरपट्ट्यातील शुगर टेक्‍नॉलॉजी कोर्स झाले बंद ; विद्यार्थ्यांनीही फिरविली पाठ

बोलून बातमी शोधा

sugar area technology course closed in kolhapur due limitations of student

पाठोपाठ इंडस्ट्रिअल इलेक्‍ट्रिकल हा कोर्सदेखील विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाअभावी टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. 

साखरपट्ट्यातील शुगर टेक्‍नॉलॉजी कोर्स झाले बंद ; विद्यार्थ्यांनीही फिरविली पाठ
sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : नैसर्गिक सुबत्तेमुळे जिल्ह्यात साखर उद्योग, औद्योगिक विकास वाढीस लागला. शिरोलीतील औद्योगिक वसाहत आणि जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये गरजेचे असणारे अभियंते निर्माण करण्याचे काम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय केले; परंतु तंत्रनिकेतन महाविद्यालयात चालणारा शुगर टेक्‍नॉलॉजीचा कोर्स विद्यार्थ्यांअभावी बंद आहे. पाठोपाठ इंडस्ट्रिअल इलेक्‍ट्रिकल हा कोर्सदेखील विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाअभावी टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. 

जिल्ह्यात चौदा साखर कारखाने आहेत. याच कारखान्यांत अभियंत्यांची गरज ओळखून शुगर टेक्‍नॉलॉजी, इंडस्ट्रिअल इलेक्‍ट्रिकल असे कोर्सेस शासनाने सुरू केले; परंतु जिल्ह्यातील सहकार चळवळ मोडीत निघत असल्याने कारखाने आर्थिक अडचणीत आले. पगार, अभियंत्यांच्या नव्या नेमणुकाही थांबल्या. यामुळे शुगर टेक्‍नॉलॉजीचा कोर्स पूर्ण करून साखर कारखान्यात नोकरीला लागण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत गेली आहे. तीन वर्षांपासून बोटावर मोजण्याइतपत विद्यार्थी होते.  

हेही वाचा - फ्लॅशबॅक ; कोल्हापूरच्या लक्ष्मीबाई जाधव अन्‌ महापालिकेची आरोग्य सेवा!

औद्योगिक संस्थांना सुपरवायझरच्या रुपात अभियंते दिले; परंतु साखर कारखान्यांच्याच्या जिल्ह्यातच कोर्स बंद झाला आहे. शुगर टेक्‍नॉलॉजीचे शिक्षण घेत महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळत असते; परंतु या क्षेत्रात आलेली नवी टेक्‍नॉलॉजी व परराज्यात नोकरीस न जाण्याच्या मानसिकतेमुळे विद्यार्थ्यांची कोर्सला नकारघंटा आहे. औद्योगिक वसाहतीत कुशल तंत्रज्ञांची गरज असते त्यात इंडस्ट्रीयल इलेक्‍ट्रिकल कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष संधी असते; पण या औद्योगिक संस्थेतील संधी कमी होत असल्याने विद्यार्थ्यांकडून सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच आय.टी आयला पसंती दिली जात आहे.

अभियंत्यांना नवी संधी

शहरात इलेक्‍ट्रिकल किंवा आय.टी. पार्क उभारण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास या क्षेत्रात इंडस्ट्रीयल इलेक्‍ट्रिकल अभ्याक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची गरज निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचवण्याची गरज आहे. तरच शुगर टेक्‍नॉलॉजीनंतर अडचणीत असणारा हा कोर्स सुरू राहू शकतो.

"‘स्कूल कनेक्‍ट’ उपक्रम राबवत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलो. महाविद्यालयांत मिळणाऱ्या सोई-सुविधांची माहिती दिली. विद्यार्थी वाढीसाठी विविध कार्यशाळा झाल्या. माध्यमातून जाहिरात करून आम्ही विद्यार्थ्यांना यंदा प्रवेशाचे आवाहन केले."

- प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

हेही वाचा -  इचलकरंजी हादरली ; परिसरात 24 तासात दोन खून झाल्याने खळबळ -

संपादन - स्नेहल कदम