esakal | फ्लॅशबॅक ; कोल्हापूरच्या लक्ष्मीबाई जाधव अन्‌ महापालिकेची आरोग्य सेवा!

बोलून बातमी शोधा

flashback special article by sambhaji gandmale in kolhapur laxmibai jadhav

लक्ष्मीबाई जाधव म्हणजे भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका.

फ्लॅशबॅक ; कोल्हापूरच्या लक्ष्मीबाई जाधव अन्‌ महापालिकेची आरोग्य सेवा!
sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : साडेतीन दशकांपूर्वी कसबा गेट परिसरात महापालिकेने सुरू केलेला लक्ष्मीबाई जाधव धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना आणि त्यानंतर याच ठिकाणी स्थापन झालेली रक्तपेढी आजही गोरगरिबांसाठी आधारवड ठरत आहे. मध्यंतरीच्या काळात या आरोग्य सेवेच्या खासगीकरणाची चर्चा सुरू झाली. उत्पन्न कमी असल्याचे कारण सांगून ती बंद करण्याचा घाटही घातला गेला; पण त्याविरोधात काही नगरसेवकांनीच दंड थोपटले आणि हे प्रस्ताव बारगळले. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका (कै.) लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मृतीही या आरोग्य सेवेच्या निमित्ताने आजही जपल्या गेल्या आहेत. 

लक्ष्मीबाई जाधव म्हणजे भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका. शास्त्रीय संगीतातील गौरीशंकर, जयपूर अत्रोली घराण्याचे प्रसिद्ध गायक अल्लादिया खाँ आणि त्यांचे बंधू हैदर खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम गायन समाज देवल क्‍लब या संस्थेने आयोजित केला. त्यांचे विधीपूर्वक गंडाबंधन अल्लादिया खाँसाहेबांच्या हस्ते झाल्यानंतर कार्यक्रमांसाठी आणि अर्थार्जनासाठी त्या आपले गुरू हैदर खाँ यांच्या परवानगीने बाहेर पडल्या.

हेही वाचा -  आता जयंतरावांची वेळ आणि खेळ... -

पहिल्यांदा त्यांनी म्हैसूर दरबारात स्वत:च्या गायनाचा कार्यक्रम केला. त्यानंतर इंदूर, देवास संस्थानिकांचे आमंत्रण त्यांना मिळाले. बडोदा संस्थानचे संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना ‘दरबार गायिका’ म्हणून बडोद्याला येण्याची विनंती केली आणि त्यानंतर वीस वर्षे त्यांनी ही सेवा केली. १९४४ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा त्या कोल्हापुरात आल्या. त्यानंतरही देशभरात त्यांच्या मैफली सातत्याने होत. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिकांनी उच्चांकी विक्रीचा विक्रम नोंदवला. त्यांना कोणच वारसदार नसल्याने आपल्या इच्छापत्रात स्वत:चे राहते मोठे घर गोरगरिबांसाठी दवाखाना असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी सार्वजनिक न्यासाची स्थापना करण्यात आली. त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी महापालिकेचा धर्मार्थ दवाखाना आणि रक्तपेढी सुरू झाली. 

श्रीमती लक्ष्मीबाई जाधव धर्मार्थ होमिओपॅथी दवाखान्याचे उद्‌घाटन २९ मार्च १९८१ रोजी झाले. तत्कालीन महापौर बाबूराव पारखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक बाबासाहेब मांगुरे, आरोग्य समिती सभापती एच. के. संकपाळ, उपमहापौर शत्रुघ्न पाटील, आयुक्त व्ही. एस. करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आजही रोज सकाळी साडेआठ ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत येथे रुग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते.

हेही वाचा - इचलकरंजी हादरली ; परिसरात 24 तासात दोन खून झाल्याने खळबळ -

दिवसाला सरासरी वीस ते पंचवीस रुग्ण त्याचा लाभ घेतात. रक्तपेढीच्या वतीने महिन्याला किमान चार रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. गरजेनुसार शहरातील सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे, महाविद्यालयांना आवाहन केले जाते आणि रक्त संकलित केले जाते. रक्तदानाबरोबरच शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबतचे प्रबोधनही यानिमित्ताने केले जाते, असे रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम