जिल्ह्याचे नेमके उत्पन्न समजणार । Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग करणार सहा जिल्ह्यांचा उत्पन्न अंदाज प्रकल्प

कोल्हापूर : जिल्ह्याचे नेमके उत्पन्न समजणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाला जिल्हा उत्पन्न अंदाज प्रकल्प देण्यात आला आहे. राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हा प्रकल्प देण्यात आला असून, या अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांचा उत्पन्न अंदाज काढण्यात येईल. यामुळे जिल्ह्याचे नेमके उत्पन्न किती हे समजणार आहे. जिल्हानिहाय उत्पन्न निश्चित करण्याची पद्धत पहिल्यांदाच विकसित होणार आहे. हा प्रायोगिक प्रकल्प असून, सहा जिल्ह्यांच्या उत्पन्न निश्चितीनंतर सर्व जिल्ह्यांसाठी ही पद्धत अवलंबली जाणार आहे, अशी माहिती अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी दिली.

देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जी.डी.पी) मोजले जाते. त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज येतो. याचा उपयोग विविध प्रकारच्या योजना, आर्थिक धोरण ठरवताना होतो. देशातील बरेचसे उद्योग, व्यवसाय असे आहेत ज्यांची मोजदात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून होत नाही. राज्याची स्थितीही अशीच असून, अद्याप जिल्हा उत्पन्न अंदाज मोजले जात नाही. याची पद्धत अद्याप विकसित नाही. त्यामुळे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून प्रायोगिक तत्त्‍वावर राज्यातील सहा जिल्ह्यांचे उत्पन्न अंदाज काढले जाणार आहेत.

हेही वाचा: औरंगाबाद : महिनाभरात सर्व सुरळीत होणार

त्यासाठीचा प्रकल्प विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाला दिला आहे. लवकरच कामाला सुरूवात होईल. शेती, उद्योग, व्यापार आणि सेवाक्षेत्रासह अन्य बाबींचीही मोजदाद होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या नेमक्या उत्पन्नाचा अंदाज येईल. कोणत्या व्यावसायिक क्षेत्रात किती लोक कार्यरत आहेत, रोगजार क्षमता किती आहे, कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक करावी लागेल. अशा अनेक बाबी समोर येतील. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर याच पद्धतीने इतर जिल्ह्यांचे उत्पन्न अंदाज घेतले जातील. त्यातून राज्याच्या उत्पन्नाचा अंदाज येईल. भविष्यात राज्य सरकारला धोरण बनवताना, योजना आखताना नेमकी माहिती हाती असल्याने त्यातील अचुकता वाढेल.

हेही वाचा: "छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्द लिहिताना भान राखावं"

अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या अंतर्गत तेथील सांख्यिकी अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सचिव व अन्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

"राज्याचा उत्पन्न अंदाज नेमका किती हे पहायचे असल्यास असंघटित क्षेत्रातील उत्पन्नाचाही अंदाज घेतला पाहिजे. यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार आहे. यामुळे जिल्हा उत्पन्न अंदाज निश्चितीची पद्धत विकसित होणार असून, भविष्यात त्याचा वापर देशभर करता येईल. यासाठी वेगवेगळ्या उत्पन्न अंदाज करण्याच्या पद्धती अभ्यासण्यात येतील."

- प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले, अर्थशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

Web Title: The Exact Income Of The District Will Be Understood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top