esakal | हिंमतबहाद्दर घराण्याची मानाची सासनकाठी

बोलून बातमी शोधा

हिंमतबहाद्दर घराण्याची मानाची सासनकाठी
हिंमतबहाद्दर घराण्याची मानाची सासनकाठी
sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : सांगली-आष्टा मार्गावर वसलेले कसबे डिग्रज (ता. मिरज) हे गाव. गावाजवळून कृष्णा नदी वाहते. जोतिबाच्या चैत्र यात्रेत सहभागी होणाऱ्या सासनकाठ्यांपैकी काठीचा तिसरा क्रमांक आहे. हिंमतबहाद्दर चव्हाण घराण्याची काठी म्हणून प्रसिद्ध आहे. गुढीपाडव्यादिवशी सकाळी ही सासनकाठी कृष्णा नदीकाठी नेली जाते. काठीला पाण्याने धुतले जाते. त्यानंतर पोशाख चढविला जातो. चव्हाण घराण्याचे पांढऱ्या रंगाचे निशाण असून या काठीस पाच तोरण्या (काढण्या) असतात.

प्रत्येक तोरणी धरणाऱ्यांचा मान हा पूर्वीपासून वेगवेगळा आहे. कृष्णा नदीवर काठीची पुरोहित, डवरी पूजा करतात. त्यानंतर काठी उभी केली जाते. कृष्णा नदी ते गावातून वाड्यापर्यंत सवाद्य मिरवणुकीने जयघोषात काठी उभी करून आणली जाते. त्यानंतर पुरोहित काठीच्या खालच्या बाजूस असणाऱ्या फळीवर ज्योतिर्लिंग मूर्ती ठेवून पूजा करतात. यावेळी डवरी ज्योतिर्लिंगाची कवने गातो. या पूजेवेळी चव्हाण घराण्यातील मंडळी, प्रतिष्ठित व्यक्ती हजर असतात.

जोतिबा चैत्र यात्रेवेळी सासनकाठी घेऊन गावातील ३०० लोक चालत डोंगरावर येतात. डोंगरावर दीपमाळेजवळ उखळात काठी उभी करून ठेवली जाते. यात्रा झाल्यानंतर डिग्रजच्या वेशीवर सर्व गावकरी स्वागतासाठी येतात. गावातील महिला सडा घालून, रांगोळी काढून औक्षण करतात. काठी सवाद्य मिरवणुकीने गावातील चव्हाण वाड्यावर आणली जाते. त्यानंतर पाच दिवसांनी महाप्रसाद घातला जातो.

"आमच्या हिंमतबहाद्दर चव्हाण घराण्याची तिसऱ्या क्रमांकाची सासनकाठी असून, या काठीची परंपरा आमच्या घराण्याने पुढे चालवली आहे. आम्ही या काठीची सेवा भक्तिभावाने करतो."

- ॲड. संग्रामसिंह चव्हाण सरकार, कसबे डिग्रज, ता. मिरज