
उन्हाळ्यात समजा दररोज ५० टन मासा मिळाला तर यातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त टिलापिया तर स्थानिक माशांचे प्रमाण दोन ते तीन टक्के.
Kolhapur : माशांच्या अंड्यांवर 'टिलापिया' मारतोय ताव; पाण्यातील जैवविविधताही करतो नष्ट!
कोल्हापूर : टिलापियाला डुक्कर मासाही म्हटलं जातं. कारण ही तसंच आहे. डुकरासारखी खाद असते टिलापियाची. नदीत जे उपलब्ध आहे, ते अक्षरश: ओरबाडून खातो. दर तीन महिन्यांनी टिलापिया अंडी घालतो, उत्पत्तीही भरपूर. जून सुरू झाला की, कृष्णा नदीतून तो उलट दिशेने पंचगंगेत येतो.
पंचगंगेत आला की मरळ, शेंगाळा, कळशी, वॉम्ब, तांबर, खडस, वडसुडा, घुगरा, बरग, तांबुडका, अरळी, डोकऱ्या, पोटीव, कानस, पानगा, रोहू, मृगल, कटला, सायप्रनस, ग्रासकार्प, सिल्व्हर कार्प, शिंगटी, खवली, नकटा या स्थनिक प्रजातींच्या माशांची अंडी, पिल्ले खाऊन टाकतो. नैसर्गिक माशांची उत्पत्ती ठप्प झाली.
पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांत तो ठाण मांडून बसला आहे. रोहित काटकर म्हणाला, ‘‘जिथे कुठे खराब, शेवाळलेलं, मचुळ, घाण वास येणारं पाणी आहे, तिथं तो दिसतो. शुद्ध पाण्यात तो फिरकत नाही. आम्ही जाळी टाकल्यानंतर स्थानिक प्रजाती चुकून मिळतात. जाळ्यात सर्वाधिक प्रमाण असतं ते, टिलापियाचं.’’
उन्हाळ्यात समजा दररोज ५० टन मासा मिळाला तर यातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त टिलापिया तर स्थानिक माशांचे प्रमाण दोन ते तीन टक्के. जिल्ह्यातील जलस्त्रोतांत टिलापियानं घुसखोरी केलेली दिसते. पंचगंगा, कृष्णेचा संगम नृसिंहवाडी इथे होतो. तेरवाडमधील बंधाऱ्यात उन्हाळ्यात पाण्याला दुर्गंधी सुरू झाली की, अनेकांना असह्य होते, पण या बंधाऱ्यात फक्त टिलापिया दिसतो. पंचगंगा प्रदूषित झाली. हे प्रदूषण टिलापियाच्या पथ्याशी पडलं.
‘टिलापिया’ कुठून आला?
टिलापियाचं मूळ नाव टिलापिया मोझांबिकास (Tilapia Mozambica)/ओरेक्रोमिस मोझांबिकस. नंतर अपभ्रंश होऊन तो चिलापी झाला. देश स्वतंत्र झाला तेव्हा तो महाराष्ट्रातील नद्यांत दिसत नव्हता. त्याचं मूळ स्थान आफ्रिकेतील बोत्सवाना. नदीतील परिस्थिती खडतर असली तरी तो तग धरतो. एकदा तो कोणत्याही जलस्त्रोतात शिरला की, तिथून हटविणं कठीण. अगदी चिवट तणांप्रमाणे. अगदी आम्लयुक्त, अल्कलीयुक्त पाण्यातही तो तगतो.
जैविक, रासायनिक प्रदूषण टिलापियाला आवडतं. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कमी झाला की, स्थानिक मासे पळ काढतात किंवा मृत होतात, पण टिलापिया तग धरतो. शेवाळ, पाणवनस्पती, अन्य माशांची अंडी खाऊन जगतो. टिलापियाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या पिलांना धोका वाटला की, तो पिलांना तोंडात सामावून घेतो. आपली अंडी तोंडात घेऊन फिरतो.
भयावह उत्पादन क्षमता
पुनरुत्पादनासाठी टिलापिया नदी, धरणाचा तळ ढवळतो. पाणी गढूळ होतं. परिणामी इतर मासे, वनस्पतींना हानिकारक ठरते. कुठल्याही पाण्यात शिरला की, तिथला तो ताबा घेतो. त्याला ‘अॅक्वॉटिक चिकन’ही म्हणतात. मासेमारीच्या उत्पादनासाठी तो १९५२ मध्ये महाराष्ट्रात आणला. सुरुवातीला तो बंदिस्त तळ्यांत सोडला. तिथून सुटून सर्व नद्यांत शिरला. पंचगंगा, कृष्णेतही आला. टिलापियामुळे स्थानिक मासे जसे हद्दपार झाले, तसे पाण्यातील जैवविविधताही नष्ट झाली.