
पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून युवराज संभाजीराजे व धनंजय महाडिक उमेदवार असताना राष्ट्रवादीचा पराभव झाला.
Loksabha Election : कोल्हापुरातून हसन मुश्रीफ लोकसभा निवडणूक लढवणार? घेतला 'हा' मोठा निर्णय
कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेपासून दोन अपवाद वगळता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कायम विजय झाला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आमचा असून, येथून आमचा उमेदवार निवडून आणू शकतो,’ असा दावा ‘राष्ट्रवादी’चे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला.
तसेच चेतन नरके, व्ही. बी. पाटील, के. पी. पाटील यांच्याबरोबर माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांचे नाव न घेता माझा एक उमेदवार असे सूचकपणे सांगत आमच्यात भरपूर इच्छुक आहेत, असेही सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांचा खासदारकीसाठी माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे रोख असल्याचे दिसून आले होते. तसेच महाविकास आघाडीत कोल्हापूरची (Kolhapur Lok Sabha Constituency) जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास मुश्रीफ उमेदवार योग्य ठरतील, अशी तिथे चर्चा झाली. त्यानंतर याबाबत राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.
या पार्श्वभूमीवर बूथ कमिटीची आढावा बैठक झाल्यानंतर स्टेजवरूनच आमदार मुश्रीफ यांनी जाहीरपणे मत व्यक्त केले. ते म्हणाले, की कोल्हापूरच्या खासदारकीच्या जागेवरून चर्चा सुरू आहे. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून युवराज संभाजीराजे व धनंजय महाडिक उमेदवार असताना राष्ट्रवादीचा पराभव झाला. ते अपवाद वगळता या मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय झाला आहे.

कॉंग्रेसच्या सहकार्याने जिल्ह्यातील जिल्हा बॅंक, महापालिका तसेच अलीकडील गोकुळपर्यंत विविध संस्था ताब्यात ठेवल्या आहेत. उद्धव ठाकरे कोल्हापूर व हातकणंगले या दोन जागा आपल्या आहेत असे सांगत आहेत. पण त्या दोन जागा विजयी होत असताना स्थिती वेगळी होती. त्यांचे राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर आमदार होते. त्यातील दोघांचा पराभव झाला आहे.
आता कॉंग्रेसचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. तर खासदारकीसाठी चेतन नरके, व्ही. बी. पाटील, के. पी. पाटील यांच्याबरोबरच माझा एक उमेदवार असे इच्छूक भरपूर आहेत. त्यामुळे ठाकरेंना हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे, तसेच ही जागा निवडून आणू,असे सांगितले पाहिजे.
अजून एकदा विधानसभा लढविण्याची इच्छा
‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आल्यास आमदार हसन मुश्रीफ योग्य उमेदवार असल्याचे एकमत मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत झाले होते. त्यानंतर काल पत्रकारांशी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी कार्यकर्ते, पक्षाने कितीही आग्रह केला, तरी लोकसभा लढविणार नाही, अजून एकदा विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली.