
बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानावर आधारित अंधश्रद्धेला थारा नसलेला मानवाच्या कल्याणाचा धम्म दिला आहे.
Rajratna Ambedkar : बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या घटनेला 'सत्याग्रह' म्हणणं चुकीचं; आंबेडकरांच्या पणतूचं मोठं विधान
गुहागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी ज्ञान आणि बुद्धीच्या बळाने निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम केले. हा जागृतीचा अग्नी कायम तुमच्या मनात तेवत ठेवा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा या धम्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोकराव आंबेडकर यांनी केले.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्धविहाराच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा (Bhartiya Bauddha Mahasabha) या धम्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोकराव आंबेडकर (Rajratna Ambedkar) आले होते. त्यांच्या हस्ते बुद्ध विहाराच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
राजरत्न आंबेडकर म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या समाजाला हक्क आणि अधिकार देण्यासाठी व्यतित झाले. इतिहासामध्ये महाडमधील चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून नोंद झालेल्या घटनेला सत्याग्रह म्हणणे चुकीचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले ते ऐतिहासिक आंदोलन होते.'
'पाणी नाकारणाऱ्यांपर्यंत योग्य संदेश पोहोचविण्याचे काम या आंदोलनाने केले. माणसाला माणसासारखे जगता वागता आले पाहिजे. त्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकार त्यांना मिळालेच पाहिजेत. या आग्रही भूमिकेतून डॉ. बाबासाहेबांनी आंदोलने केली. कोकणातील कार्यकर्त्यांनी, जनतेने त्यांना भक्कम साथ दिली आणि ती आंदोलने यशस्वी झाली.'
बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानावर आधारित अंधश्रद्धेला थारा नसलेला मानवाच्या कल्याणाचा धम्म दिला आहे. याच धम्म मार्गाने बाबासाहेबांनी आपल्याला जगाशी जोडले आहे. त्यामुळे आपली दखल जगातील बौद्ध राष्ट्र घेत असतात. म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी आपल्या मनात चेतवलेला जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.