
कोष्टी कला महोत्सव ६ मेपासून
इचलकरंजी : समाजातील कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कलांच्या माध्यमातून त्यांना वेगळे महत्त्व प्राप्त व्हावे या हेतूने हटकर कोष्टी समाज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टतर्फे इचलकरंजीत ६ ते ८ मेदरम्यान राज्यस्तरीय कोष्टी कला महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती समस्त हटकर कोष्टी समाज जिल्हाध्यक्ष राहुल तेलसिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या कलाकारांना सोबत घेतले आहे. तसेच व्यवसाय सांभाळून विविध कलांमध्ये पारंगत महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या अंगभूत कलेला संधी मिळावी यासाठी महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करुन देण्यात येत आहे. हा उपक्रम समाजामार्फत घेतला जात असून त्यामध्ये कला महाविद्यालयातील विद्यार्थी जीडी आर्ट, कमर्शिअल आर्टिस्ट यांची निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, आर्कचित्रे, मातीकाम, स्थापत्य कलेतील शिल्पे, कल्पक शिल्पकृती, काष्टशिल्प, कल्पक पोस्टर्स, छायाचित्रकारांची छायाचित्रे, शिल्पाकृती यांचा समावेश असणार आहे.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे तीन दिवस हा कला महोत्सव भरवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी जास्तीत जास्त कलाकृती पाठवून सहकार्य करावे. यासह ७ मे रोजी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. ७ मे रोजी महिलांसाठी दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. कला महोत्सवास उपस्थित राहून कलाकारांना दाद द्यावी, असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेत हेमंत कबाडे, सुलेखनकार विनायक चिखलगे व शिल्पकार निखिल करोशी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..