esakal | कामातच आम्ही शोधला विठ्ठल..! यंदा गावातच आनंदवारी
sakal

बोलून बातमी शोधा

कामातच आम्ही शोधला विठ्ठल..! यंदा गावातच आनंदवारी

कामातच आम्ही शोधला विठ्ठल..! यंदा गावातच आनंदवारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : ‘‘पंढरपूरचा कानडा विठ्ठल आणि रखुमाई म्हणजेच आमचा बाप आणि आई. पंढरपूरची वारी कधी चुकली नाही; पण गेली दोन वर्षं एखाद्या माहेरवाशिणीला माहेराला जायला नाही मिळालं तर तिच्या मनाची जी चलबिचल होते, तशीच आमची अवस्था झाली आहे. पण असो. कोरोनाविरोधातील लढाईला बळ देण्यासाठी आपापल्या कामांत ‘विठ्ठल’ शोधण्याचा माउलीचाच विचार असावा आणि म्हणूनच आमची कामं आम्ही विठ्ठलाच्या नामस्मरणातच इमाने-इतबारे करत आहोत...’’ गावगाड्यात हाडाची काडं करून राब राब राबणारी वारकरी मंडळी आपल्या भावना व्यक्त करतात.

कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही पायी वारीची मोठी परंपरा आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी वारीचे दहा दिवस म्हणजे या सर्वांसाठी आनंद पर्वणीच. मात्र, दोन वर्षे ही पर्वणी त्यांना साधता आली नाही. गेल्या वर्षी प्रतीकात्मक दिंड्या निघाल्या; पण यावरही यंदा निर्बंध आहेत. त्यामुळे अगदी चार-पाच लोकांच्या उपस्थितीत मंदिरात वीणापूजन करून हरिपाठ, भजनाचे कार्यक्रम सुरू आहेत, असे दरेवाडीचे बाळासाहेब मोळे सांगतात.

हेही वाचा: शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

फुलेवाडी, नागदेववाडी, मरळी, चुये, येवती, निगवे खालसा आदी गावांतही पायी वारीची मोठी परंपरा आहे. तब्बल तीस ते चाळीस वर्षे अनेक वारकरी मंडळींनी वारी चुकवली नाही. गेली दोन वर्षे सहभागी होता न आल्याची खंत मनात असली तरी आपापले काम सांभाळत गावातच त्यांनी विठुनामाचा गजर सुरू ठेवला आहे. गोविंदा पाटील-चुयेकर सांगतात, ‘‘आमच्या परिसरात वारीची अनेक वर्षांची परंपरा आहे.

तरुण पिढीही काही वर्षांत वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते. यंदा प्रस्थानदिवशी गावातील मंदिरात वीणापूजन केले. सकाळी काकडा, हरिपाठ, सायंकाळी भजन असे कार्यक्रम मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू आहेत. काही वारकरी मंडळी अगोदरच पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊन आली आहेत. हीच यंदा तरी आमच्यासाठी आनंदवारी आहे.’’

हेही वाचा: CET Exam ची अनिश्चितता; 11 वी प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम

loading image