
मुश्रीफांविरुद्धच नेत्यांचे कट कारस्थान; आमदार कोरेंचा आरोप
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या उमेदवारांविरोधातच काम केलेल्या नेत्यांचा लेखाजोखाच आमदार डॉ. विनय कोरे (Vinaya kore) यांनी नेत्यांच्या बैठकीत मांडला. (KDCC) ज्यांनी आघाडीविरोधात मतदान केले त्यांची नावे घेऊन तालुकानिहाय पंचनामाच त्यांनी बैठकीत करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांच्या विरोधातच हे कट कारस्थान होते, असाही गंभीर आरोप केल्याचे समजते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे तीन उमेदवार पराभूत झाले. यावरून श्री. कोरे निकालाच्या दिवसापासून तीव्र भावना या ना त्या निमित्ताने व्यक्त करत आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मला गृहीत धरू नका, अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला होता. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरवण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर आयोजित सत्तारूढ गटाच्या बैठकीतच त्यांनी नेत्यांना खडे बोल सुनावल्याचे समजते.
हेही वाचा: आज आबा असते तर...; वडिलांच्या आठवणीने रोहित पाटील भावूक
शेतकऱ्यांसाठी काम करणारी ही बँक चांगली चालावी, ती राजकारण विरहीत असावी म्हणूनच मी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो. त्यातूनही पॅनेल करताना मतभेद झाले असतील; पण एकदा उमेदवार ठरल्यानंतर फसवाफसवी कशासाठी, असा सवालही त्यांनी या बैठकीत उपस्थित केला. पॅनेलचे उमेदवार ठरवताना ज्यांनी विरोधात काम केले त्यांनी त्याच वेळी उमेदवारीवर आक्षेप घ्यायला हवा होता. त्या वेळी पुन्हा चर्चा करून मार्ग काढता आला असता.
एकदा उमेदवार ठरल्यानंतर राधानगरी, करवीर, भुदरगड तालुक्यांत आघाडीच्या उमेदवारांना नेत्यांच्या घरातीलही मते मिळत नाहीत याचा अर्थ काय, एवढ्या मोठ्या उंचीवर काम करणाऱ्या नेत्यांकडूनच असा विश्वासार्हतेला तडा दिला जात असेल तर हे चांगले नाही, असाही टोला त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व इतरांची नावे घेऊन लगावल्याचे समजते. यावर ए. वाय. यांनी आपली चूक याच बैठकीत मान्य केल्याचीही चर्चा आहे. सत्तारूढ गटाच्या पॅनेलची जबाबदारी फक्त माझ्यावर नव्हती तर हसन मुश्रीफ यांच्यावरही होती; पण मुश्रीफ यांच्या विरोधातच कट कारस्थान केले. आजऱ्यातून अशोक चराटी यांचा पराभव झाला आणि शाहूवाडीत रणवीर गायकवाड यांनी पाठिंबा दिला म्हणून तुम्ही वाचलात, असा टोलाही कोरे यांनी मुश्रीफ यांना उद्देशून बैठकीत लगावल्याचे समजते.
हेही वाचा: अनिल देशमुख गौप्यस्फोट | परमबीर माझ्यासमोर थरथर कापत होते
त्यांनी मन मोकळे केले ः मुश्रीफ
तालुकानिहाय आकडेवारीसह नेत्यांचा भांडाफोड करून श्री. कोरे बैठकीतून तडक निघून गेले. बाहेर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. श्री. मुश्रीफ यांनी मात्र कोरेंनी मन मोकळे केले एवढीच प्रतिक्रिया दिली.
Web Title: Vinaya Kore Says Political Leaders Opposed To Hasan Mushrif In Kolhapur Kdcc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..