esakal | 'मंदिरे उघडा, श्रद्धांशी खेळू नका' 
sakal

बोलून बातमी शोधा

Vishwa Hindu Parishad protest in kolhapur

आंदोलनामध्ये सुरुवातीला मुलींनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या.

'मंदिरे उघडा, श्रद्धांशी खेळू नका' 

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील मंदिरे बंद केली. आता आठ महिने होऊन गेले तरी अद्याप मंदिरे उघडलेली नाहीत. मद्याची दुकाने, मंडई, व्यायामशाळा, कार्यालये सर्व सुरू झाले तरी अद्याप मंदिरे बंदच ठेवली आहेत. मंदिरे ही आमची श्रद्धास्थाने आहेत. आमच्या श्रद्धांशी शासनाने खेळू नये. त्वरीत राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत. अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली. आपल्या मगणीसाठी आज त्यांनी मिरजकर तिकटी येथे आंदोलन केले. 

आंदोलनामध्ये सुरुवातीला मुलींनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. "उद्धवा दार उघड, घराचे नव्हे मंदिराचे' अशा अभिनव घोषणा देत कार्यकर्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. हातामध्ये फलक घेऊन महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विश्‍व हिंदू परिषदेची भूमिका स्पष्ट करताना जिल्हामंत्री ऍड.रणजीत घाटगे म्हणाले," कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य सरकारने मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशातच लॉकडाउन होते. अशा काळात मंदिरे बंद करण्याचा निर्णय समजू शकता येतो. मात्र आता अनलॉक सुरू झाले. शाळा, महाविद्यालये वगळता सर्व शासकीय कार्यालये, मॉल, हॉटेल, बार, वाईनशॉप, मंडई सुरू झाल्या आहेत. नागरिक मुक्तपणे सर्वत्र जात येत आहेत. अशा काळात शासनाने फक्त मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. कोरोनामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रम, यात्रा, वारी रद्द करण्यात आले आहेत. अशावेळी मंदिरात जावून देवाचे दर्शन घेण्याची मुभा तरी भक्तांना देण्यात यावी. निर्जंतुकीकरणाचे सर्व पर्याय उपयोगात आणून आवश्‍यक ती खबरदारी घेऊन मंदिरे सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्य राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहेत. शासनाने मंदिरे खुली केली नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन करू.' 

हे पण वाचाजोतिबा देवाची श्रीकृष्ण रुपातील महापूजा ; उद्या होणार दिवे ओवाळणी

यावेळी विक्रम बोधे, सुनेत्रादेवी घाटगे, संदीप लाड, विजय हावळ, विनिता हावळ, राजनंदिनी लाड, राजवर्धन लाड, रोहिणी माने, स्वाती माने, रणधीर पाटील, वीर पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top