esakal | महाराष्ट्रात आधुनिक तलवारबाजी अकादमी स्थापन करणार -पालकमंत्री पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात आधुनिक तलवारबाजी अकादमी स्थापन करणार -पालकमंत्री पाटील

महाराष्ट्रात आधुनिक तलवारबाजी अकादमी स्थापन करणार -पालकमंत्री पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जागतिक तलवारबाजी दिनाच्यानिमित्ताने पॅव्हेलियन ग्राउंड येथे अद्यावत तलवारबाजी संकुलाचे भूमिपूजन भारतीय तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार ऋतुराज पाटील, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, सचिव डॉ. उदय डोंगरे व मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: सांगली: दुबईतील कंपनीचा व्यापाऱ्याला १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा

या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरु झालेला व महाराष्ट्राची लढाऊ वृत्ती अधोरेखित करणारा खेळ म्हणजे 'तलवारबाजी'. आज जागतिक तलवारबाजी दिनानिमीत्त कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तलवारबाजी हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विडा उचलला आणि त्यात युद्धकलेला अनन्यसाधारण महत्त्व दिले.

तलवारबाजी, दांडपट्टा यांसारखे युद्धकलेचे प्रकार महाराष्ट्राच्या मातीत अगदी खोलवर रुजले आहेत. तलवारबाजी या प्राचीन युद्धकलेने प्रगत तंत्रांचा वापर करत आधुनिक रूप धारण केले आहे. जगभरात आधुनिक तलवारबाजीचा प्रसार व प्रचार जोमाने सुरू असताना तलवारबाजी सारखा शिवकालीन खेळ महाराष्ट्रामध्ये अधिक प्रभावीपणे विकसित व्हावा यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.

आधुनिक साहित्यासह राष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात तलवारबाजी अकादमी अर्थात फेंसिंग अॅकॅडेमी विकसित करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले असून त्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा मानस आहे.

कोल्हापुरातील खेळाडूंना कोल्हापूरमध्येच अत्याधुनिक सोयी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या वर्षी टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या तलवारबाज भवानी देवी ने प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करून इतिहास रचला आहे. त्यातून प्रेरणा घेऊन पुढील ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे तसेच देशातील जास्तीत जास्त तलवारबाजपटू कसे झळकतील यासाठीचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचे देखील ते म्हणाले.

यावेळी तलवारबाजीची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. यावेळी राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोढे, दिलीप घोडके, विकास वाघ, डॉ.पांडुरंग रणमाळ, प्रशांत जगताप, राजू शिंदे, विनय जाधव, पद्माकर जगदाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्नील तांगडे, तुषार आहेर, माजी नगरसेवक-नगरसेविका, श्रीराम सोसायटी चेअरमन व संचालक, खेळाडू आदी उपस्थित होते.

loading image
go to top