esakal | कोरोनाचा फटका : थेट पाईपलाईनला लॉकडाऊनचे विघ्न

बोलून बातमी शोधा

pipeline project

सलग दुसऱ्यांदा कोरोनाचा फटका या कामाला बसला. थेट पाईपलाईन योजनेच्या कामात अनेक अडथळे येत राहिले.

कोरोनाचा फटका : थेट पाईपलाईनला लॉकडाऊनचे विघ्न
sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर :‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने’या म्हणीप्रमाणे थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची अवस्था झाली आहे. नैसर्गिक अडथळ्यामुळे थेट पाईपलाईन योजनेतील जॅकवेलच्या कामाला एप्रिल आणि मे असे दोनच महिने मिळतात. त्यातील बरेच दिवस पाणी उपसा करणे, गाळ काढणे यात जातात. हे अडथळे कायम असतानाच सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका या कामाला बसला आहे. या कामावर परप्रांतीय मजूर काम करतात. लॉकडाउनमुळे हे मजूर पुन्हा बिहारला गेले. परिणामी आहे त्या उपलब्ध मनुष्यबळावर कसेबसे काम सुरू आहे.

सलग दुसऱ्यांदा कोरोनाचा फटका या कामाला बसला. थेट पाईपलाईन योजनेच्या कामात अनेक अडथळे येत राहिले. सुरवातीपासूनच या अडथळ्यांवर मात करीत हे काम आता इथपर्यंत आले आहे. परवानग्यांच्या घोळात दोन वर्षांहून अधिक काळ गेला. त्यानंतर जॅकवेलच्या कामाला सुरवात झाली. धरणक्षेत्रातील जॅकवेलचे काम पूर्ण करणे हे एक आव्हान महापालिका आणि ठेकेदार कंपनीसमोर आहे. मुळात येथील पाणी कमी करणे आणि गाळ काढणे यात खूप मोठा काळ जातो. त्यातूनही कसेबसे ४० ते ५० दिवसच जॅकवेलचे काम करायला मिळतात.

हेही वाचा: निशब्‍द...मुलीचा कोरोनानं मृत्यू आणि वडिलांनी सोडला जीव; आईपण पॉझिटिव्ह

पावसाळ्यात पुन्हा हे काम बंद करावे लागते. त्यामुळे थेट पाईपलाईन योजनेचा खोळंबा झाला आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षीही जॅकवेलच्या कामाला हातच लागला नाही. त्यामुळे यंदा हे काम लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. डी वॉटरिंग झाले, पण पुन्हा आता कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्य शासनाला लॉकडाउन करण्याची वेळ आली. या काळात परप्रांतीय मजूर येथे थांबणे कठीण झाले. हे सर्व मजूर बिहारचे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यात जाणे पसंत केले. परिणामी, त्याचा फटका या योजनेच्या कामावर झाला आहे. बरेच मजूर परगावी गेल्याने कामावर परिणाम झाला आहे.

उन्हाळ्यातच करावी लागतात धरणक्षेत्रातील कामे

थेट पाईपलाईन योजनेत जॅकवेल हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर इंटेक विहीर, सुपरविझींग विहीर या दोन विहिरींपासून जॅकवेलपर्यंत पाईपलाईन आणि वीजपुरवठा अशी या योजनेतील कामे अपुरी आहेत. या कामांमध्ये नैसर्गिक अडथळे येतात. जॅकवेलची साईट, इंटेक विहीर, सुपरविझिंग विहीर हे धरणक्षेत्रात असल्याने उन्हाळ्यातील दोन महिन्यांत काम करावे लागते. इतर वेळी काम करायला वाव मिळत नाही.

पाईपलाईनचे काम करण्यासाठी ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असते. पण, सध्या ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने पाईपलाईनचे काम बंद आहे. ज्यावेळी ऑक्‍सिजन उपलब्ध होईल, त्यावेळी या कामाला सुरवात करण्यात येईल. काम थांबू दिले जाणार नाही.

- राजेंद्र माळी, प्रतिनिधी, जीकेसी कंपनी