
Weather Forecast Kolhapur : पावसाने दोन-तीन दिवसात उसंत घेऊन आज जोरदार सुरुवात केली. शहरासह धरण क्षेत्रात दिवसभर दमदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली, तर धरणक्षेत्र व नदीक्षेत्रात पडलेल्या पावसाने पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फूट एक इंचाने वाढली. १७ बंधारे पाण्याखाली आहेत. नऊ मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहिली. दरम्यान, उद्या मंगळवारपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात यलो अलर्टचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तविला आहे.