esakal | 22 कोटींचे बजेट पण जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीला मुहूर्त मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

22 कोटींचे बजेट पण जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

22 कोटींचे बजेट पण जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी अट्टाहासाने निधी मिळवला. सोयीप्रमाणे निधीच्या खर्चाचे नियोजनही केले. मात्र पावसाळा तोंडावर असतानाही शाळा दुरुस्तीच्या कामांना मुहूर्त मिळालेला नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तर काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्‍त केला आहे. जूनपूर्वी कामे झाली नाही, तर पुढे पाच महिने काम रखडणार आहे. नवीन वर्ग खोल्या व दुरुस्तीसाठी 2020-21 सालात 22 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या सुमारे 1900 प्राथमिक शाळा आहेत. अनेक शाळा शंभर वर्षापूर्वीच्या आहेत. अनेक शाळांची पुर्णत: पडझड झाल्याने नवीन वर्ग खोल्यांसह जुन्या खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 22 कोटी निधी मिळाला आहे. मात्र निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. निधी उपलब्ध झाला तरी अंदाजपत्रक तयार करणे, त्यास प्रशासकीय मान्यता देणे, तांत्रिक मान्यता देवून नंतर कामाचे आदेश देणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: गोकुळ रणांगण! पुन्हा सत्ताधारी की सत्तांतर? फैसला उद्या

मात्र मागील वर्षाचा ताळमेळ अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत तर कधी तांत्रिक कारणांचा पाढा वाचत या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक शाळा दुरुस्त व्हाव्यात म्हणून अनेक शाळांचे छत काढले आहेत. काही शाळांनी भिंती उतरल्या आहेत. मात्र काम सुरु करण्याचे आदेशच नसल्याने पुढील कामे थांबली आहेत.

"शाळांतील नवीन वर्ग खोल्या तसेच दुरुस्तीची कामे लवकर मार्गी लागावी यासाठी शिक्षण विभागाला व अर्थ विभागाला सुचना दिल्या आहेत. तरीही या कामात प्रगती नसल्याचे दिसते. जर दोन दिवसात संबंधित शाळांना वर्क ऑर्डर मिळाल्या नाहीतर दोषींवर कठोर कारवाई करणार."

- प्रवीण यादव, सभापती शिक्षण व अर्थ समिती.

हेही वाचा: तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू; सिरसेतील दुर्घटना

"शिक्षण विभागाने घाईगडबडीने शाळा दुरुस्तीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. कामाची वर्क ऑर्डर मिळेल, असे गृहित धरुन अनेक शाळांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. बांबवडे प्राथमिक शाळेचीही दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजुनही वर्क आर्डर मिळाली नाही. शिक्षण विभागाने आणखी विलंब केला तर यावर्षीही शाळातील गळती कायम राहिल."

- विष्णू यादव, बांबवडे, ग्रामपंचायत सदस्य.

loading image