डीएड महाविद्यालये व्हेंटिलेटरवर :, विद्यार्थी शोधण्याची वेळ 

मिलिंद देसाई
Sunday, 13 September 2020

डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम डीएड महाविद्यालयांवर झाला आहे.

बेळगाव : विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे अगोदरच व्हेंटीलेटर असलेल्या डीएड महाविद्यालयांसमोर कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन देखिल शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांनाही विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. 

शिक्षक भरतीस होत असलेला विलंब तसेच विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकरच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील 90 टक्‍के विना अनुदानीत डीएड महाविद्यालये यापुर्वीच बंद झाली आहेत. तसेच दरवर्षी बेळगाव शहरातील डीएड महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्‌या प्रमाणात रोडावत असून शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांना मध्येही विद्यार्थी कमी पडत आहेत.बेळगाव जिल्ह्यात एकुण 84 डीएड महाविद्यालये होती व विद्यार्थीही मोठ्या संख्येने होते.

हेही वाचा- भाजपकडून महाविकास आघाडीला उकसवण्याचे कटकारस्थान -

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम डीएड महाविद्यालयांवर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारने 9500 शिक्षकांच्या जागा भरती केल्या होत्या. तरीही राज्यात 14000 हुन अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र कायमस्वरूपी जागा भरती करण्याऐवजी अतिथि शिक्षकांची नेमणुक करुण शिक्षण खाते वेळ मारून नेत आहे. 

हेही वाचा-घर बांधायचे आहे पण : मुद्रांक शुल्कात कपात; मात्र बांधकामाच्या किमतीत वाढ

2012- 13 सालच्या शैक्षणिक वर्षांपासून चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांमधील 40 तर बेळगाव शैक्षणिक जिल्हामधील 31 डीएड महाविद्यालये बंद झाली आहेत. गेल्या दोन तिन वर्षात डीएड महाविद्यालयांमधील सरकारी कोट्यातील जागाही भरल्या जात नाहीत असे दिसून येत आहे. सध्या जिल्हातील फक्‍त अनुदानित डीएड महाविद्यालये सुरु आहेत. यापैकी शहरात पाच डीएड महाविद्यालये असून यापैकी अनेक डिएड महाविद्यालयांना मोठा इतिहास असुन काही वर्षांपुर्वी डिएड महाविद्यालयांसमोर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मोठमोठ्‌या रांगा लागत होत्या. त्यामुळे डिएड महाविद्यालयांना मोठी मागणी होती. तसेच अधिक अधिक प्रमाणात डोनेशन देऊन प्रवेश घ्यावा लागत होता. मात्र सातत्याने शिक्षक भरती होत नसल्याचा फटका डीएड महाविद्यालयांना बसत आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the last two to three years government quota seats in DEAD colleges have not been filled